नवी दिल्ली : लीना मणीमेकलई यांच्या ‘काली’ या माहितीपटावरून देशात नवा वाद सुरू झाला आहे. त्यांच्या माहितीपटाच्या पोस्टरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे यासंदर्भात बोलताना तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एक विधान करून नवा वाद ओढवून घेतला. मात्र आता त्यांनी आपण केलेल्या वक्तव्यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी काली मातेसंबंधी केलेल्या पोस्टवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “तुम्हा सर्व संघी लोकांना – खोटे बोलल्याने तुम्ही चांगला हिंदू बनणार नाही. मी कधीही कोणत्याही चित्रपटाचे किंवा पोस्टचे समर्थन केले नाही किंवा धूम्रपान या शब्दाचा उल्लेख केला नाही. माझा सल्ला आहे की तुम्ही तारापीठावर जा आणि माँ कालीला भोग म्हणून कोणते अन्न आणि पेय अर्पण केले जाते ते पहा”. असे त्यांनी म्हटले आहे.
To all you sanghis- lying will NOT make you better hindus.
I NEVER backed any film or poster or mentioned the word smoking.Suggest you visit my Maa Kali in Tarapith to see what food & drink is offered as bhog.
Joy Ma Tara— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 5, 2022
या अगोदर महुआ मोईत्रा यांनी “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर निघाला होता. त्यावरच त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.