बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) –गंगाधाम-कात्रज रस्त्यावर हिलटॉप-हिलस्लोप झोन’मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गोडाऊन उभारण्यात आली आहेत. महापालिकेकडून प्रशस्त रस्ते, वीज आणि पाणी या सारख्या सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच वाढीव मिळतकरही वसुल केला जातो. परंतु, आता हेच गोडाऊन अनधिकृत ठरवित महापालिकेच्या आडून कारवाईची भिती दाखवित जागा बळकविण्याचा प्रकार सुरू असल्याचे संबंधीत मालक, जागा मालकांचे म्हणणे आहे.
गंगाधाम-कात्रज रस्त्यावरील हिलटॉप-हिलस्लोप झोन भविष्यात रहिवासी झोन होण्याची दाट शक्यता आहे. शासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच येथील जागेवर बेकायदेशीर ताबे घालणे, जागा बळकविण्याचे प्रकार सुरू असून यातून अनेक फौजदारी कारवाया सुद्धा झालेल्या आहेत.
या झोनमधील जागेत गोडाऊन उभारले जात असताना कोणतीही कारवाई होत नाही. काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेकडून नोटीस पाठवत कारवाईची भीती दाखविली जात आहे. यातून काही जण अशा जागा कवडी मोलात मिळविण्याचा प्रकार करीत असल्याचे काही व्यापारी जागा मालकांनी सांगितले.
दरम्यान, अनधिकृत गोडाऊन व ओढ्यावरील अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी नगरसेविकांकडून पालिकेला पत्र देण्यात आले आहे. आगीच्या दुर्घटना घडलेल्या नागरी वस्तीतील जागा सोडून इतर जागेवर कारवाई का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
आयुक्तांनी येथील गोडाऊन, शेडच्या संख्येबाबत माहिती मागवली होती. येथील शेडवर कारवाईच्या काही बोगस नोटीसा देण्याचा प्रकार घडला असून सदर बोगस नोटिसांबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. येथील व्यापाऱ्यांची दिशाभूल करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– माधुरी मिसाळ,
आमदार, भाजप पक्ष
व्यापाऱ्यांच्या जागा मिळविण्यासाठी राजकीय बळाचा वापर केला जात आहे. येथील मोकळ्या जागांवर बेकायदेशीर ताबे घेतले जातात. व्यापारी आपल्या जागा सुरक्षित करण्यासाठी कंपाऊंड व पत्रे लावत असले तरी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो.
– राजकुमार लोढा, व्यापारी
या परिसरातील मोजक्याच गोडाऊनवर कारवाई करून राजकारण केले जात आहे. जाणीवपूर्वक काही शेडवरच कारवाई होत आहे. अनधिकृत गोडाऊन बांधण्यास सुरुवात करताना महापालिकेचे अभियंते झोप काढीत असतात का? करोनामुळे सगळ्यांनाच मोठ्या अडचणी आहेत, त्यातून प्रशासनाने उपाय काढणे गरजेचे आहे.
– मानसी देशपांडे,
नगरसेविका भाजप पक्ष
आग सारख्या दुर्घटनेच्या जागी असलेल्या गोडाऊनवर आम्ही कारवाई केली नसल्याची सत्य परिस्थिती आहे. मात्र, हेतू पूर्वक आम्ही कारवाई करीत नाही. यापुढेही अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करणार आहोत. कर विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने ज्यांनी कर वेळेत भरला नाही, त्यांनाच आम्ही नोटीस देत आहोत. माझ्या कार्यकाळात बोगस नोटीस बाबत कोणती तक्रार आलेली मला आठवत नाही.
– उमेश शिद्रुक, कनिष्ठ अभियंता,
बांधकाम विकास विभाग, मनपा