सातारा जिल्ह्यात दरमहा वीजग्राहक दिनाचे आयोजन

नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी महावितरणचा उपक्रम

मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणार

बारामती परिमंडलात येत्या 23 जुलैपासून आयोजित प्रत्येक महिन्यातील वीजग्राहक दिनाच्या उपक्रमाला सुरुवात होत आहे. प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे तसेच प्रभारी अधीक्षक अभियंता उदय कुलकर्णी हे कार्यालयीन दौऱ्यादरम्यान विभाग कार्यालयात आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.

सातारा – सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व संवसु विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात वीजग्राहक दिन आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. येत्या दि. 23 जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, वडूज, वाई व फलटण या विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येईल. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वतः ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.

कार्यकारी अभियंता सुटीवर किंवा दौऱ्यावर असल्यास संबंधीत विभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे काम पाहणार आहेत. तसेच एखाद्या महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी शासकीय सुटी असल्यास, दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलातील सर्व विभागांत जुलै महिन्याच्या चौथ्या मंगळवारपासून म्हणजेच दि. 23 जुलै 2019 रोजी या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.