सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्रावर “ओल्या पार्ट्या’

मद्यपींचा धिंगाणा, स्थानिक नागरिकांमधून कारवाईची मागणी
संतोष कोकरे

ठोसेघर – सातारा शहराला कास तलावातून पाणी पुरवठा होतो. कासवरून सातारा शहरापर्यंत पाणीपुरवठा होण्याआधी यवतेश्‍वर घाटातील सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्याचे शुद्धीकरण करून नंतर पावर हाऊस येथून शहरापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून सांबरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र हे मद्यपींसाठी ओल्या पार्ट्यांचा अड्डा बनले आहे. याठिकाणी राजरोसपणे बिनधास्त तळीरामांचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे सांबरवाडी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून कास पठार व तलावाच्या ठिकाणी होणाऱ्या ओल्या पार्ट्या आणि हुल्लडबाजांवर पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून असल्यामुळे सध्या सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्र मद्यपी आणि हुल्लडबाजांच्या रडारवर आहे. याठिकाणी मद्यपी आणि हुल्लडबाजांना अटकाव करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे सांबरवाडी या दारूच्या बाटल्या रित्या करून धुडगूस घालण्यासाठी “सेफ झोन’ बनला आहे.

याची साक्ष याठिकाणी पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आणि जागोजागी जेवण बनवण्यासाठी तयार केलेल्या चुली, प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास आणि पत्रावळ्यांचा मोठ्या प्रमाणावरील कचरा देतो. याठिकाणी पार्टीसाठी जमलेल्या टोळक्‍यांकडून गाडीतील म्युझिक सिस्टिमचा मोठा आवाज सोडून धिंगाणा घातला जातो. तर काही महाभाग जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यात गाड्याही धुतना आढळतात.

दरम्यान, या परिसराच्या आसपास सांबरवाडी ग्रामस्थांची जनावरे चरण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी गुरे चारण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थ त्याचबरोबर विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दारूच्या नशेत एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर एखाद्या विघ्नसंतोषीने पाण्यात काही विषारी पदार्थ मिसळल्यास सातारकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होवू शकतो. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या ओल्या पार्ट्या आणि हुल्लडबाजीला जरब बसवण्याची मागणी नागरिकांमधून
होत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही वावर

सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सातारा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही महाविद्यालयाला दांडी मारून कायम वावर असतो. यातील काही विद्यार्थीदेखील मद्यधुंद अवस्थेत तर काही सिगारेटचे दम मारताना आढळून येतात. ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब असल्याने याची गंभीर दखल घेवून कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)