सुनीता शिंदे
अर्थसंकल्पातील 25 टक्के तरतुदीचे होते तरी काय ?
पालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 25 टक्के रकमेची तरतूद केलेली असते. त्याप्रमाणे या वर्षीही करण्यात आली आहे. मात्र पालिकेने त्या रकमेचे काय नियोजन केले? अथवा त्या रकमेतून आजपर्यंत फॉगिंग मशिन का खरेदी केल्या नाहीत? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
कराड, दि. 4 – स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत गत दोन वर्षापासून सहभागी झालेल्या कराड पालिकेकडे शहरात किटकनाशक फवारणी करण्याकरीता फक्त चारच फॉगिंग मशिन व सात स्प्रे मशिन आहेत. शहरातील लोकसंख्येचा विचार करता पालिकेकडे आणखी फॉगिंग मशिनची गरज असतानाही या मशिनची खरेदी का केली जात नाही? सध्या उपलब्ध असणाऱ्या मशिन कीटकनाशक फवारणी करण्यासाठी कमी पडत आहेत.
या मशिनद्वारे शहरातील काही भागात दोन ते तीन दिवसांनी फवारणी होते तर काही भागात होत नाही. यावर्षी पडणाऱ्या सततच्या पावसामुळे डासांचे प्रमाण वाढतच चालले असून नागरिकांची सुरक्षा आता या फॉगिंग मशिनवरच अवलंबून आहे.
कराड पालिकेकडून 350 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेचे नियोजन केले जाते. या सर्वांच्या कामाची विभागणी करण्यात आली आहे. कोणी कचरा गोळा करतात, कोणी कचऱ्याचे वर्गीकरण करतात, कोणी शहरात स्वच्छता करतात, कोणी कंपोस्ट खतासाठी बकेट वाटप करतात तर कोणी फॉगिंग मशिनद्वारे शहरात कीटकनाशक फवारणी करतात. सततच्या पावसामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे.
या डासांमुळे अनेकांना डेंग्यू सदृश्य साथीचा प्रार्दूभाव झाला. तर तीन जणांचा बळीही गेला. या डासांवर तात्काळ उपाय म्हणून फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी केली जाते. या फवारणीच्या कामासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी शहरातील काही भाग वाटून घेऊन तेथे धूर फवारणी करताना दिसतात. या मशिनद्वारे कर्मचारी त्या भागात धूर सोडून पुढे जात असतात. मात्र त्याचा परिणाम फार काळ टिकत नाही.
दोन तासानी पुन्हा त्या परिसरात डास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मशिनची संख्या अपुरी असल्यामुळे एकदा फवारणी केलेल्या परिसरात पुन्हा ते कर्मचारी काही दिवसानंतरच फवारणी करताना दिसतात. त्याचा परिणाम म्हणून डासांचा प्रार्दूभाव वाढू लागला आहे. कितीही स्वच्छता केली तरी डास काही कमी होत नाहीत.
डासांची उत्पत्ती ही सततचे बदलते वातावरण यामुळे होत असते. त्यामुळे त्यावर सातत्याने औषध फवारणीचा मारा केल्यास त्यांची उत्पत्ती कमी होऊ शकते. सध्या शहरात डेंग्यूसदृश्य साथ कमी झाली असली तरी डासांचे अथवा डासांच्या अळीचे प्रमाण कमी झालेले नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी औषध फवारणीमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेचे हे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. शहर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या पालिकेने याबाबतही जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच पालिकेचे पदाधिकारी शहर विकासासाठी मोठा निधी आणल्याचे सांगतात. मात्र त्यातील काही निधीतून फॉगिंग मशिन खरेदी करण्याबाबत कोणीच का बोलत नाही असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
कराड नगरपालिका शहरातील स्वच्छतेबाबत नेहमीच जागरूक आहे. कोठेही कचरा साठू नये, यासाठी सुयोग्य नियोजन केले जात आहे. बदलत्या वातावरणामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सध्या चार फॉगिंग मशिन व सात स्प्रे मशिनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. मात्र शहरातील डासांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेऊन आणखी चार फॉगिंग मशिन खरेदी करण्यात येणार आहेत.
आर. डी. भालदार, नोडल ऑफिसर, आरोग्य विभाग