आठवलेंच्या सूत्रावर संजय राऊत म्हणाले…

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला नवीन फॉर्मुला दिला असल्याचे काल वक्तव्य केले होते. भाजपचा 3 वर्ष मुख्यमंत्री तर शिवसेनेचा 2 वर्ष, असे सूत्र त्यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना सुचवले होते. यावर आता संजय राऊत यांनी विधान केले आहे. धन्यवाद, पण आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला आमची चिंता करण्याची गरज नाही. मात्र, लवकरच शिवसेनाप्रणीत सरकार सत्तेत येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजून सस्पेंन्स कायम असून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला नवीन फॉर्म्युला सुचविला होता. रामदास आठवले यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की आपण संजय राऊत यांच्याशी भाजप आणि शिवसेना यांच्यात तडजोडीसाठी बोललो आहे. मी त्यांना नवीन फॉर्म्युला सुचविला आहे. ज्याअंतर्गत 3 वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री आणि 2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकतो.

यापूर्वी, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर हे दोन्ही नेते भेटले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल याचा मला विश्वास आहे. सरकार बनविणे आपली जबाबदारी नव्हती. ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती ते पळून गेले, परंतु मला खात्री आहे की लवकरच सरकार स्थापन होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यात भाजपने 105 जागा जिंकल्या, तर शिवसेना 54 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर निवडणून आली. परिणामी, भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी मतभेद झाले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष राज्यात स्थिर सरकार देण्यास अपयशी ठरले असून राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.