बडे थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर

नगर  – महापालिकेचा प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी थकीत मालकत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मालमत्ताकराची थकीत वसुली का होत नाही, असा सवाल करत बड्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍स बोर्डवर झळकाविण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी वसुलीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त सुनील पवार, करसंकलन अधिकारी गबाजी झिने, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, अंबादास सोनवणे यांच्यासह करनिरीक्षक उपस्थित होते.

मालमत्ताकराची सुमारे 282 कोटी रुपयांची थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, वसुली का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. मालमत्ताकराच्या वसुलीवर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. या थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍स बोर्डवर लावण्यात यावीत. जप्तीच्या नोटिसा बजावून मालत्ताकराची वसुली, लिलावा प्रक्रिया, पोलीस बंदोबस्त घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

महापालिकेचे चार प्रभाग कार्यालये असून, या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना सरासरी दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मार्च अखेरपर्यंत 50 कोटींपर्यंत वसुली करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीत शास्ती माफीचा मुद्दा मांडण्यात आला. शास्ती माफीमुळे वसुली जास्त होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, द्विवेदी यांनी शास्ती माफीस स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे शहरातील कोणत्या बड्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्‍स बोर्डवर झळकणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.