पुणे – शहरातील खासगी लॅबमध्ये करोनाबाधित सापडण्याचे प्रमाण तब्बल 40 टक्के, तर हेच प्रमाण शासकीय लॅबनी 20 टक्के आहे. याशिवाय, 6 खासगी लॅबनी मागील दोन ते तीन दिवसांचे अहवाल गुरुवारी एकाच दिवशी महापालिकेस दिल्याने शहरातील करोनाबाधितांचा आकडा थेट 1,812 वर गेल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
करोना चाचण्या करणाऱ्या या लॅबनी चाचण्यांचा तपशीलवार अहवाल तसेच बाधितांची वेळेत माहिती न दिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. त्यामुळे चाचण्यांच्या अहवालावरून खासगी लॅब पालिकेच्या रडारवर आल्या आहेत. पुढील आठवड्यात या सर्व लॅबची तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात नवीन बाधितांचा आकडा 800 च्या आसपास स्थिरावला होता. त्यानंतर गुरुवारी अचानक तो 1,800 वर गेला. त्यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला. या बाधितांच्या आकड्यांचा तपास केला असता या 1,812 मध्ये तब्बल 800 जण खासगी लॅबच्या अहवालात बाधित असल्याचे समोर आले, तर हे अहवाल मागील तीन ते चार दिवसांचे होते. त्यामुळे प्रत्यक्षात खासगी लॅबने पालिकेने यापूर्वी सूचना केल्याप्रमाणे केंद्राला माहिती दिल्यानंतर जास्तीतजास्त 24 तासांत पालिकेस कळविणे अपेक्षित असताना दोन ते तीन दिवसांनी कळविल्याचे समोर आले. त्यामुळे खासगी लॅब हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र आहे. हे अहवाल वेळेत न मिळाल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंगही शक्य झाले नसल्याने पालिकेने ही बाब गांभीर्यने घेतली आहे.
लॅब थेट रुग्णालयांशी संलग्न…
खासगी लॅबकडे तपासणीसाठी जाणाऱ्यांतून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण तब्बल 40 टक्के आहे. तर, पालिका यंत्रणेच्या अहवालानुसार हे प्रमाण 22 टक्के आहे. खासगी लॅबची टक्केवारी अधिक असण्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यताही अधिकारी व्यक्त करत आहेत. यातील काही लॅब या थेट रुग्णालयांशी संलग्न आहेत. परिणामी, बाधितांना लगेच संबधित रुग्णालयात बेड उपलब्ध होतात, तर इतर लॅबमध्ये अथवा महापालिकेच्या चाचणीत बाधित असलेल्यांना बेडसाठी शहरभर फिरावे लागते. त्यामुळे या लॅबकडील उपकरणे, साधने, किट जुनी आहेत की नवीन, नेमकी कशा प्रकारे तपासणी करतात, यासह या लॅबचा कन्फर्मेशन रेट अधिक कसा काय जास्त, याचीही पडताळणी केली जाणार असल्याचे रुबल अगरवाल यांनी सांगितले.