पुणे – पुणे-गोवा मार्गावर एसटी महामंडळाच्या प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात साध्या बसने प्रवास करावा लागणार आहे. शिवाजीनगर (वाकडेवाडी) ते पणजीदरम्यान वातानुकूलित शयनयान शिवशाही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे महामंडळाने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात वातानुकूलित बस सुरू न करता साधी (लालपरी) बससेवा सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांच्या सोईसाठी शिवाजीनगर आगारातून शिवाजीनगर- पणजी बस सुरू केली जाणार होती. मात्र, सद्यस्थितीत साधी बस सुरू असल्याने प्रवाशांची संख्याही घटण्याची शक्यता आहे. यामुळे, लवकरात-लवकर वातानुकूलित बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
बाहेरील राज्यात बस धावणार असल्याने आंतरराज्यीय परवाना मिळणे गरजेचे होते. तसेच वातानुकूलित शयनयान बस सुरू करताना आरटीओ विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. हा परवाना मिळाला नसल्याने सदर मार्गावर साधी बस सुरू केल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दिवसभरात दोन बसेस
शिवाजीनगर-पणजी (गगनबावडामार्गे) जाणारी बस रात्री सात वाजता शिवाजीनगर आगारातून सुटते. या बसला प्रतिव्यक्ती 795 रुपये तिकीट दर आहे. तर, शिवाजीनगर-पणजी (राधानगरीमार्गे) दुसरी बस असून रात्री साडेआठ वाजता असून या बसचे तिकीट 805 रुपये आहे.