मुंबई – जागतिक तापमान वाढीचा फटका काही वर्षांपासून जाणवत असून लहरी हवामानामुळे सर्वसामान्यांसह शेतक-यांचेही मोठे नुकसान होत आहे. सध्या राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक जिल्ह्याचा पारा 40 च्या पार गेला होता. कडाक्याच्या उन्हामुळे राज्य होरपळून निघाले होते. काही ठिकाणी पिकेही करपली होती. या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.
कडाक्याच्या ऊन असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि तळकोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर गारपीठही झाली. यामुळे द्राक्षे आणि अंब्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील गिरणारेसह आजूबाजूच्या परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांदा, द्राक्ष यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चिंतेची बाब म्हणजे या पावसामुळे उन्हाळी कांद्याला मोठा फटका बसला असून कांद्याची उभी पिकं आडवी झाली आहेत. या पावसामुळे बळीराजा हतबल झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजूला बुरशी, कीड रोगांचा प्रादुर्भाव तर आंबा डागाळण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पावसाचा हलक्या सरी कोसळल्या.
सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. तीन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कडक उन्हामध्ये अचानकच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागातही गारांचा पावसाने झोडपले.
द्राक्षाचे मोठे नुकसान
सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱा आणि गारपीठ झाल्याने हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापुरातील बंकलगी गावात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.