लोणावळा शहरात आभूषणे, कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
लोणावळा – साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला विविध वस्तू, सोने, आभूषणे, वस्त्रखरेदी करण्यासाठी लोणावळा शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला प्रमुख बाजारपेठांमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला कपडे, मिठाई, झेंडूची फुले, पूजासाहित्य आदी वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानास व झेंडूच्या फुलांना महत्त्व आहे. त्याच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ, पुणे-मुंबई हायवे नाका याठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली होती. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स शोरूम, कपड्यांची दुकाने, मिठाईच्या दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.
दसरा म्हणजे खरेदीचा सुवर्णमुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी लाभदायी मानली जाते. म्हणून या दिवशी नवीन वस्तू, वाहने व सोने खरेदीकडे अनेकांचा ओढा असतो. यामुळे शहरातील सुवर्ण बाजारपेठेतील सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. हीच गर्दी दसऱ्याच्या दिवशीही कायम राहणार असल्याने सुवर्णपेढ्याही सज्ज झाल्या आहेत.
झेंडू खातोय भाव
दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याअनुषंगाने झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली असून, फुलांचे दर गगनाला पोहोचले आहेत. सोमवारी दर 60 ते 100 रुपये किलोप्रमाणे विक्रीस होते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली.