Pune News : नुकताच स्वराज्याचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा दाखवणारा “छावा ” चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू आहे. आपल्या पुर्वजांचा इतिहास आपल्या आजच्या पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच हेतूने पुण्यातील बालाजीनगर येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने युद्धामध्ये वापरल्या गेलेल्या जुन्या शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. काल १७ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात युद्धात वापरलेल्या विविध प्रकरच्या तलवारी, जिरेटॉप, भाले, धनुष्यबाण, वाघणखे, विविध प्रकारचे आडकित्ते, ढाली, सिरोही तलवार, मुघलं तलवार, बिचवे, राजस्थानी तलवार, खंजीर या सर्व गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनासाठी पुण्यातील लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी गर्दी केली होती. आजच्या धावापळीच्या युगात मुले ही इतिहासापासून दूर चालली आहेत. आपल्या राजा महाराजांचा इतिहास त्यांना समजावा, इतिहास घराघरापार्यंत जावा या भावननेने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.