‘डॉक्‍टर्स डे’ निमित्ताने…

“गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी एक मराठीत म्हण आहे. आपण जेव्हा एखाद्या आजाराने हवालदिल होतो, तेव्हा डॉक्‍टर हा आपल्याला देवासारखा असतो, पण त्याने एकदा का आपल्याला चांगले बरे केले की, कसला डॉक्‍टर न्‌ काय … विसरून जातो आपण त्याला. खरं तर पूर्वीपासून अनेक ध्येयवेड्या संशोधक सर्जननी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे, अथक संशोधनामुळे आज आपण खूपच चांगले जीवन जगतो आहोत. मग त्यांची वर्षातून एकदा तरी आठवण ठेवायला हवी ना? त्यासाठीच एक जुलै हा डॉक्‍टर दिन मानला गेला आहे.

शस्त्रक्रिया ही गोष्ट आपण जरी आता आधुनिक समजत असलो तरी तिचा इतिहास थेट अश्‍मयुगात जाऊन भिडतो. अश्‍मयुगातील जीवघेण्या शस्त्रक्रियांपासून आजच्या अवकाशयुगातील वेदनाविरहित शस्त्रक्रियांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्या वेळच्या सर्जन्सनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केलं. त्या काळातील समाजानं या सर्जन्सची उपेक्षाच केली, पण तरीही धीर न सोडता अनेक प्रकारचे प्रयोग करून डॉक्‍टर्सनी शस्त्रक्रियांची तंत्रे विकसित केली.

हिपोक्रातेस हा वैद्यक शास्त्राचा जनक समजला जातो. ग्रीसमधील कॉस बेटावर ख्रि.पू. 460मध्ये त्याचा जन्म झाला. त्याची महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यानं वैद्यक शास्त्राला गूढगहन वलयातून बाहेर काढलं. दुसरं म्हणजे निडॉस आणि कॉस या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असलेलं ज्ञान सुसूत्रपणे बांधून त्यानं वैद्यक विषयाला शास्त्रशुद्ध पाया दिला आणि त्यानं केलेलं तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे त्यानं वैद्यकीय व्यवसायाची नीतीमूल्ये ठरवली. “मी उपचार केले, देवानं बरं केलं’ हे पूर्वीच्या डॉक्‍टर्सचे वचन आजही प्रसिद्ध आहे.

प्राचीन काळात अभ्यासाची साधने प्रगत नव्हती. तरीसुद्धा प्राचीन व नंतर मध्ययुगीन काळात शल्यविद्येसंबंधी त्या वेळच्या काहीजणांना चांगली माहिती होती असं दिसतं. त्यावेळी डॉक्‍टर्सनी जी निरीक्षणं केली, संशोधन करून जे रोगनिदान केलं ते आजही आताच्या प्रगत वैद्यक शास्त्रातील माहितीशी काही ठिकाणी तंतोतंत जुळतं आहे. वैद्यकशास्त्राची ज्ञानगंगा अरबांकडे गेल्यावर तिची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी झाली, पण तिची नैतिक उंची वाढली. त्यांनी शल्यवैद्यांसाठी एक प्रार्थना तयार केली. ती इतकी अर्थपूर्ण आहे की आजच्या सर्व डॉक्‍टर्सनी या प्रार्थनेचे दररोज एकदा तरी पठण करायला हवे आणि तसं वागण्याचा प्रयत्न करायला हवा. ख्रिस्तपूर्व आठशे ते दोनशे या काळात वैद्यकशास्त्र समाजापर्यंत पोचवण्याकरिता चरक आणि सुश्रुत या दोघांनी दोन ग्रंथ लिहिले. चरकसंहितेमधे मुख्यतः मेडिसिनविषयी माहिती दिलेली आहे. शल्यकर्म म्हणजेच सर्जरी हाच सगळ्यात उत्तम उपचार आहे असं सुश्रुताचं मत होतं. चरकसंहितेमधे ही विद्या कुणाला शिकवावी, त्याची व्याप्ती कशी वाढवावी याचं त्यानं सखोल विवेचन केलं आहे.

त्याचबरोबर प्रॅक्‍टिस करणारा शल्यवैद्य कसा नसावा याचं या संहितेमधे त्यानं उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. त्या काळात बऱ्याच गुन्हेगारांना नाक कापण्याची शिक्षा होत असे. सुश्रुताचं नाव विशेष प्रसिद्ध आहे ते कापलेलं नाक दुरुस्त करण्याच्या शस्त्रक्रियेकरिता. हे कसं साध्य करायचं याचं अगदी चपखल, नेमकं वर्णन त्यानं आपल्या ग्रंथात केलं आहे. विशेष म्हणजे आज जवळजवळ अडीच हजार वर्षांनंतरही याच प्रकारची शस्त्रक्रिया प्रचलित आहे. दुसरं म्हणजे समोर येणारा रुग्ण हा सज्जन आहे की दुर्जन आहे हे डॉक्‍टरनं पाहायचं नसतं असा धडा त्यानं घालून दिला. एक माणूस म्हणून समोर येणाऱ्या रुग्णावर उपचार करण्याची सुश्रुताची नीती होती. अठराव्या शतकाला ज्ञानसाक्षात्काराचं युग असं म्हणतात. शल्यविद्या आणि शरीरशास्त्र यांचे पर्सिव्हल पॉट, विल्यम पॉट, हंटर असे नावाजलेले शिक्षक त्यावेळी लंडनमधे होते. या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया, कोलंबिया आणि हार्वर्ड या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली. एकोणिसावे शतक विविध ज्ञानशाखांमधील आश्‍चर्यकारक अशा शोधांनी गजबजून गेलं.

शल्यविद्येमध्ये आमूलाग्र बदल झाले. मुख्य म्हणजे संमोहन शास्त्र, क्ष किरण, जंतुसंसर्गांचा बंदोबस्त असे महत्त्वाचे शोध या काळात लागले. त्यामुळे शस्त्रक्रिया वाढत्या प्रमाणात करता येऊ लागल्या. विसाव्या शतकात तंत्रज्ञानात सतत होत जाणाऱ्या बदलाच्या लाटेनं सगळं जग व्यापून टाकलं आहे. भारतातही परिस्थिती बदलते आहे. शल्यविद्येच्या तंत्रामध्ये भारतीय सर्जन कुठेही कमी नाही.

भारतीय परंपरेत आपण बोटांच्या हालचाली लहानपणापासून भरपूर प्रमाणात करीत असल्याचा फायदा आपल्याला शस्त्रक्रियेच्या वेळी होतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना हस्तकौशल्यामध्ये भारतीय शल्यविशारद काकणभर सरस आहोत, पण इथल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे काही गोष्टी अंमलात येण्यात अडथळा येतो.

“डॉक्‍टर्स डे’ निमित्तानं लक्षात इतकंच घ्यायचं की, या वैद्यकशास्त्राबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवं. तसेच आज जरी आपण खूप मोठी प्रगती केली आहे असं वाटत असलं तरी त्यामागे अनेक बुजुर्गांचे कष्ट आहेत. ज्ञानलालसा आहे. आज आपण इतक्‍या झटपट कुठल्याही शस्त्रक्रिया करतो, कारण वर्षानुवर्षे या डॉक्‍टर्सनी आपल्या लोकविलक्षण प्रतिभेने या शास्त्रात सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत.

– माधुरी तळवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.