मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून जोरदार कार्यक्रमांचे आजयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, आज दादर येथील शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने येणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी दोन्ही पक्षातील प्रतिनिधी तसेच शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतील.
त्याच बरोबर कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी कुटुंबासह येणार आहेत. तसंच याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाही, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी आहे. अश्यातच आज हे दोन नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.