मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून जोरदार कार्यक्रमांचे आजयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे.
एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाही, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या. “बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांच्याशी आमचे खूप चांगले संबध होते. दुर्दैव आहे आज जी रस्सीखेच सुरू आहे ती बाळासाहेबांना कधीही पटली नसती. त्यांना हे सगळं कदापिही पटलं नसतं’. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
तसेच त्यापुढे म्हणाल्या, “विधानभवनात लावण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून सध्या हे राजकारण करण्यात येत आहे, अतिशय खालच्या पद्धतीचं चालू असून, हे मला न पटणार आहे”. असं देखील सुप्रिया सुळे बोलल्या.