हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर! ऑक्‍सिजन संपल्याने खराडीत रुग्णालयावर दगडफेक

खराडी, शेवाळवाडीत रुग्णालयांपुढे पेच

पुणे – ऑक्‍सिजन तुटवड्याचा सर्वाधिक फटका खासगी रुग्णालयांना बसला असून, ऑक्‍सिजन नसल्याने रुग्णांचा जीव आता खऱ्या अर्थाने “व्हेंटिलेटर’वर आला आहे. या सगळ्या प्रकारात खराडीतील एका रुग्णालयावर दगडफेक करण्यात आली. तर शेवाळवाडीतील एका रुग्णालयातून ऑक्‍सिजन तुटवड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्‍सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. सरकारी बेड फुल्ल झाल्यामुळे खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, तेथेही आता ऑक्‍सिजन मिळत नसल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्‍सिजन कसा द्यावा, असा त्यांच्यापुढे यक्षप्रश्‍न पडला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या या खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे मदत मागितली आहे.

खराडीत रुग्णालयावर दगडफेक
खराडी येथील एका रुग्णालयातील ऑक्‍सिजन संपल्याने रुग्णालय प्रशासनाची अक्षरश: दमछाक झाली. अखेर त्यांनी महापालिकेकडे मदत मागितली. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयावरच दगडफेक करण्याला सुरुवात केली. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला हा प्रकार घडला. अखेर पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी येथे उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांची विविध रुग्णालयात सोय केली आणि रुग्ण हलवले. यातील 5 रुग्ण जम्बोमध्ये आणि उर्वरित पाच रुग्ण तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत दाखल केले.

योग हॉस्पिटलमध्येही ऑक्‍सिजन तुटवडा
पुणे-सोलापूर मार्गावरील योग मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामध्येही असाच प्रकार घडला आहे. ऑक्‍सिजनचा पुरवठा नसल्याने येथील रुग्णाचा जीव टांगणीला लागला आहे. येथील ऑक्‍सिजन दोन दिवसांपासून कमी असून, येथे सुमारे 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यांना इतरत्र शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता. दरम्यान, त्याचवेळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. पण, त्याला ऑक्‍सिजन तुटवडा कारणीभूत नसल्याचा दावा रुग्णालयाचे संचालक डॉ. अभिजीत दरक यांनी केला. सध्या रुग्णांच्या जीविताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑक्‍सिजनचा अत्यल्प पुरवठा शिल्लक असल्याचे यांनी माध्यमांना सांगितले.

खासगी रुग्णालयांतील बेड नियंत्रणात घेताना त्यांचे मंजूर बेड आणि त्यातील 80 टक्‍के बेड आपण ताब्यात घेतो. ते घेताना त्यांचा मान्य ऑक्‍सिजन साठा हे देखील विचारात घेतले जाते; परंतु मंजूर बेडपेक्षा जास्त रुग्ण ते घेऊ शकत नाहीत. 50 बेडची मंजुरी आहे आणि त्यातील 30 बेड त्यांनी महापालिकेच्या नियंत्रणाखाली दिले असतील तर ते स्वत:हून आणखी 30 बेड वाढवून त्यांची क्षमता विनापरवानगी 80 करू शकत नाहीत. आम्ही ऑक्‍सिजनची क्षमता आणि मंजूर बेड एवढे पाहून बेड ताब्यात घेतले आहेत.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्‍त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.