पुणे – मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून मेट्रोला पाच लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून पुण्यात दोन मार्गिकांचे काम केले जात आहे. या 32 किलोमीटरच्या मार्गिकांपैकी 12 किलोमीटरच्या मार्गावर रविवारी प्रवासी सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत मेट्रो सामान्य प्रवाशांसाठी धावली. मेट्रो प्रशासनाच्या नियोजनानुसार दर अर्ध्या तासाच्या वारंवारितेने मेट्रो धावत आहे.
या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी पाच स्थानके कार्यान्वित केली आहेत. यामध्ये तीन स्थानकांपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट आणि चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दुपारी तीन रात्री नऊ या वेळेत दोन्ही मार्गिकांवर 21 हजार 74 प्रवाशांनी प्रवास केला. वनाझ ते गरवारे महाविद्यालयदरम्यान सुमारे 16 हजार प्रवाशांनी तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला.