शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चारा छावणी सुरू करणार

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती : पशुधन वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

जेजुरी – सध्या राज्यात 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाची परिस्थिती आहे. पुरंदरमध्येही पाणी आणि चारा टंचाई जाणवत आहे. दुभते गोधन हे शेतकऱ्यांचे नगदी उत्पन्न आहे. दुष्काळ, पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या बळीराजाचे पशुधन जगवण्याची भूमिका शासनाची आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरंदरमध्ये शासनाच्या वतीने चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

नाझरे (मल्हार सागर) जलाशयावर रविवारी (दि. 2) राज्य शासन, जिल्हा परिषद व श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या चारा छावणीचे उद्‌घाटन शिवतारे यांचे हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव, पंचायत समितीचे सदस्य अतुल म्हस्के, पशुधन अधिकारी अनिल इंगवले, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, नाझरे शाखा अभियंता एम. के. चवलंग, परिसरातील मंडलाधिकारी, तलाठी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले की, नाझरे धरण क्षेत्रात सुरू केलेल्या चारा छावणीत पहिल्याच दिवशी 530 पधुधन दाखल झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ही संख्या 800 ते 900 पर्यंत जाईल. शासन नियमाप्रमाणे प्रत्येक मोठ्या जनावराला 18 किलो, तर लहान जनावराला 9 किलो चारा देण्यात येणार आहे. दिवसाआड गोळीपेंड आणि पशुधन अधिकारी यांच्या मार्फत मोफत औषधोपचार होणार आहेत. येथे निवासी राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विजय शिवतारे मित्र मंडळाच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समिती, महसूल विभागाच्या वतीने पिण्याचे पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नाझरे जलाशयात दूषित पाणीसाठा
788 दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेल्या मल्हार सागर जलाशयात केवळ 67 दशलक्षघनफुट पाणीसाठा आहे. तसेच तो गाळमिश्रित व दूषित आहे. देवदर्शनासाठी आलेले भाविक येथे स्नानादीविधी करतात. त्यामुळे पाणी आणखी दूषित होते. भाविकांना पर्यायी व्यवस्था करावी व धरण क्षेत्रात मज्जाव करावा, तसे फलक लावावेत अशा सूचना राज्यमंत्री शिवतारे यांनी केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)