पिंपरी – प्राचीन शिवालय असलेल्या घोरावडेश्वर डोंगरावर महाशिवरात्रीच्या दिवशीच सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. काही नागरिकांनी झाडांच्या फांद्या तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. डोंगराच्या दोन्ही बाजूने आग लागल्याने आग आटोक्यात येत नव्हती. एकदा आग विझवल्यानंतरही दिवसभरात दोन ते तीनवेळा आग लागली होती.
महाशिवरात्रीनिमित्त घोराडेश्वर डोंगरावरील महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी डोंगरावर गर्दी केली होती. डोंगराच्या पायथ्यापासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच डोंगर पायथ्याला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक सकाळी अकराच्या सुमारास डोंगराला आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे ही आग दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पसरत गेली. या आगीमध्ये गवत आणि लहान मोठी झाडे जळून खाक झाली. तसेच दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली.
अग्निशामक दलाची एक गाडी, वनविभागाचे कर्मचारी, पोलीस आणि नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. एकदा आग विझवल्यानंतरही दिवसभरात दोन ते तीनवेळा आग लागली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.