भोर-स्वारगेट मार्गावर एस.टी बस झाली पलटी; ४० प्रवाशांचे वाचले प्राण

पाच जण झाले किरकोळ जखमी

भोर: भोर एस. टी.आगारातुन सकाळी १०.०० वा.सुटलेली एस टी. बस क्र.एम.एच.१४- बीटी – ३३८७ ही काही मिनीटांचे अंतर पार करुन गेली असता. भाटघर धरणाच्या जवळच असलेल्या सांगवी गावच्या हद्धीत अतिवृष्ठी मुळे खचलेल्या रस्त्याचे साइड पट्टीत समोरुन येणाऱ्या वाहनाला आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांना चुकवण्याचे नादात वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस साइड पट्टी वरुन गटारात जावून पलटी झाल्याची घटना घडली.

बसमध्ये भोर वरुन पुण्याकडे जाणारे सुमारे ४० ते ४५ प्रवाशी होते. काहीही समजण्याच्या आतच बस पलटी झाल्याने हे प्रवाशी घाबरुण गेले होते. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही कोणतीही जीवीत हानी झाली नसून बसमधील सौ.सुमन सुरेश खोपडे रा.भोलावडे, नवनाथ शंकर काटकर रा.हारतळी, सौ.मुक्ताबाई गणपत भिलारे रा.रावडी, चंद्रकांत तुकाराम चंनशिव रा.किवत, व मारुती धोंडीबा झुनगारे रा.सांगवी भिडे हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व प्रवाशांना सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर चे सचिन देशमुख, सांगवी गांवचे ग्रामस्थ अक्षय दामगुडे, संजय खरमरे, उमेश होसूरकर, रोहीय गायकवाड आदिंनी मदत कार्य करुन बाहेर काढले.

या घटनेची माहिती आमदार संग्राम थोपटे यांचे स्विय सहाय्यक जगन्नाथ गोळे यांना मिळताच संबधित यंत्रणांना त्यांनी लगेच कळविले. त्यामुळे भोर पोलिसांसह, एस.टी.आगाराचे कर्मचारी आणि इतर लोक घटनास्थळी दाखल झाले दरम्यान, मदत कार्य सुरुच होते. या दुर्टनेतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले तेव्हा सर्वांनी वाचलो रे बाबा! असे म्हणत वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे उद्गार काढून समाधानाचा सुस्कारा सोडला.

सर्व जखमींना तातडीने भोर’च्या उप जिल्हा रुग्णालयात पोलिस निरिक्षक राजू मोरे यांचे सहकार्याने दाखल करण्यात आले. बस चालक शिवाजी सुभाष बळी व वाहक मिनाक्षी महेश भस्मे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस निरिक्षक राजू मोरे यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरिक्षक राजेंद्र पवार व त्यांचे सहकारी पोलिस करत आहेत.


भोर ते कापुरहोळ रस्त्याची दयनीय अवस्था 

भोर ते कापुरहोळ या सुमारे १४ कि.मी.अंतराचे मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून खड्डा चुकवा आणि हजार रुपये मिळवा असे म्हणण्याची वेळ आली असून सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरील खड्डे पाणी साचल्याने वाहन चालकांस दिसतच नाहीत. मात्र भोर’च्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असुन या रस्त्यावर कायमच अपघातांचे सत्र सुरु असते. आज एस.टी.बसला झालेला अपघात हाही त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात असून भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग तरी कधी येणार ? की ते कोणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहत आहेत, अशा बोचऱ्या शब्दात प्रवाशी टिका करत आहेत.
या विषयी संबधित अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाँट रिचेबल होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.