बारामती( प्रतिनिधी) | बारामती बँकेचे सध्या सुरु असलेल्या ‘आरबीआय’ लेखापरीक्षणाची प्रत मला मिळाली आहे.याबाबत व्यक्तिश: थोडासा नाराज आहे. यामध्ये संचालक मंडळाने नीट लक्ष दिले नाहि कि अधिकाऱ्यांनी नीट लक्ष दिले नाहि. अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवले कि संचालकांनी दुर्लक्ष केले,हे समजत नाही अशाप्रकारची खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. इथून पुढील काळात अशा पद्धतीचा चुकीचा कारभार केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
बारामती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. बँकेचा कारभार मात्र स्वच्छ व पारदर्शी व्हायला हवा अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. इतर सहकारी संस्था व बँकेच्या कारभारात फरक असल्याने बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जुन्या नव्या यांचा मेळ घातला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात पवार बोलत होते.
नवीन सरकारी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न करता केवळ नफा कमविण्याच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळे अनेक बॅंका अडचणीत आल्याची उदाहरणे समोर आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तारत असलेली बारामती बँक पवार साहेबांच्या नावाने ओळखली जाते. त्यामुळे बँकेत गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारच्या काही घटना घडल्याच्या निदर्शनास आल्या आहेत. संचालक मंडळ तसेच अधिकारी वर्ग यांनी गैरकारभार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देखील पवार यांनी यावेळी दिला.
स्वतःचा किंवा नातेवाईकांचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी संचालक होण्यासाठी अनेकांना घाई झालेली असते. अशा वृत्तीच्या उमेदवारांनी बँकेवर संचालक म्हणून येऊ नये. भारतीय रिझर्व बँक व सहकारी नियमांना अनुसरूनच कामकाज होणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधितांना परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,जिल्हा परीषदेचे बांधकाम आरोग्य सभापती प्रमोद काकडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,दुध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती बँके चे अध्यक्ष श्रीकांत सिकची,उपाध्यक्ष अविनाश लगड, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी उपस्थित होते