बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मंदीला सरकारची धोरणेच कारणीभूत

सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतभेद

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग मुंबईत कडाडले, सीतारामन यांच्या टीकेचाही घेतला समाचार

मुंबई : कॉंग्रेस स्वा. सावरकरविरोधी नाही. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाच्या तिकिटाचे अनावरणही केले होते, मात्र स्वा. सावरकरांच्या हिंदुत्ववादाला आमचा विरोध होता, असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कारखाने बंद पडायला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. अर्थव्यवस्था हाताळायला हे सरकार अपयशी ठरले, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केली. हे सरकार धोरणाचा पुनर्विचार न करता स्वतःच्या चुका विरोधकांवर ढकलण्यात धन्यता मानत आहे, अशा शब्दात त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पलटवार केला.

पुढील आठवड्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी डॉ. सिंग मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारतरत्न कुणाला द्यायचं हे एक समिती ठरवते. त्याचा सरकारशी संबंध नसतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कॉंग्रेसला आदर आहे. मात्र त्यांच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतभेद आहेत. विकासाचे दुहेरी इंजिन अशा शब्दात राज्यात भाजपा सरकारला बहूमत देण्याच्या प्रचाराचाही त्यांनी समाचार घेतला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोलंबिया विद्यापीठात, मनमोहनसिंग यांच्या काळात बॅंकांची स्थिती सर्वात वाईट होती, अशी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता डॉ. सिंग म्हणाले, या वक्तव्यावर मी बोलू इच्छित नाही. मनमोहनसिंग धोरणात बदल करत असत. या टीकेवर ते म्हणाले, आपलं काय चुकतंय हेही सरकारने पहायचं असतं.

अर्थव्यवस्थेत कोणतीही गोष्ट आणण्याआधी त्याचे अचुक निदान आणि त्याची ध्येय योग्य करावी लागतात. हे सरकार त्यांच्यावरील आरोप काहीही करून विरोधकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेच्या पुनरूजीवनासाठी, विशेषत: बॅंक यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी उत्तर शोधणे अशक्‍य बनते.

देशात आणि राज्यात एकच सरकार असेल तर विकासाचे डबल इंजिन लागते, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, हे मॉडेल सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा दर खालावला. या राज्याने गेल्या पाच वर्षात सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या पाहिल्या. रसायने, खते आणि इलेक्‍ट्रॉनिक ही महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्नाची क्षेत्रातील आयात या काळात वाढली. शेतीचे उत्पन्न दुप्पट करायचे आश्‍वासन या सरकारने दिले, प्रत्यक्षात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. औद्योगिक मंदीने कारखाने बंद पडले. तरूणांना निम्म्या पगारावर काम करायला भाग पाडले जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मनमनोहन सिंग यांना अनुच्छेद 370 बाबत मनमोहन सिंग म्हणाले, आम्ही अनुच्छेद 370 हटवण्याच्या विरोधात नाही, त्याची अंमलबजावणी ज्या प्रकारे करण्यात आली त्याला आम्ही विरोध दर्शवला. अनुच्छेद 370 हटवणं हे काश्‍मीरच्या जनतेला दिलासा देणारे आहे मात्र त्याची अंमलबजावणी ज्या प्रकारे झाली ती पद्धत चुकची होती.

Leave A Reply

Your email address will not be published.