नवी दिल्ली : शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी त्यांना तीन दिवसांची म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊतांअटकेवरून सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच खासदार जया बच्चन यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
जया बच्चन यांनी संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडीओ ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांना केलेली अटक याबद्दल बोलताना दिसत आहेत.
‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “नक्कीच. आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.”
यापुढे त्यांना संजय राऊतांच्या आईबद्दल विचारण्यात आले. ‘राऊत यांची आई खूप म्हातारी आहे.’ त्यावर त्यांनी ‘हो मला माहिती आहे’, असे म्हटले. नंतर ‘ईडीचा हा अशाप्रकारे सुरु असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते’, असे विचारण्यात आले. त्यावर जया बच्चन यांनी “२०२४ पर्यंत” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.