Sanjay Raut| ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काल लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने घोषणाबाजी करत ”जय फिलीस्तीन’ म्हटले. त्यांच्या याच घोषणेवरून सध्या बराच वाद झाला आहे. ओवेसींच्या या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यानंतर सभापतींनी ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. मात्र यानंतर ओवेसी यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ओवैसी यांचे समर्थन केले आहे.
“पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे? पॅलेस्टाईन हा एक देश आहे. त्याबाबत सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईन हा एक देश आहे. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही. पण अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये, अशी नरेंद्र मोदी यांचीही भूमिका आहे. पॅलेस्टाईनमधील नरसंहाराबाबत जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जर काही ओवेसींकडून चूक झाली असेल, तर केंद्र सरकारने कारवाई करावी,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे.
यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. “गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चाललली होती. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत असून राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
घोषणाबाजीबाबत ओवेसींनी मांडली बाजू
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही शपथविधीदरम्यान झालेल्या घोषणाबाजीबाबत आपली बाजू मांडली. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, “मी सभागृहात ”जय फिलीस्तीन” म्हटले होते. “इतर सदस्यांनीही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, ‘जय फिलीस्तीन’ म्हणालो. हे चुकीचे कसे असू शकते. मला संविधानातील तरतुदी सांगा? इतरांनीही काय म्हटले आहे. महात्मा गांधींनी पॅलेस्टाईनबद्दल काय सांगितले ते वाचले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा: