पुणे – भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. याबाबतच्या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला असून येत्या ३० तारखेला आपण चौकशीसाठी ईडीपुढे हजार राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी, ‘आपल्यामागे ईडी लावल्यास आपण सीडी लावू’ असा इशारा भाजप नेत्यांना दिला होता.
खडसे यांना आता ईडीने समन्स बजावले असल्याने ते आपल्या शब्दाप्रमाणे सीडी लावणार काय? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जातोय. अशातच आता खडसेंच्या सीडी लावण्याच्या वक्तव्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता पाटील यांनी, ‘त्यांना सीडी लावण्यापासून कुणी रोखलंय?’ असा प्रश्न उपस्थित करत खडसेंच्या इशाऱ्याला भाजप भीत नसल्याचं दर्शवलंय.
दरम्यान, ईडी चौकशीबाबत आज खडसे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ईडीने आपल्याला ३० डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबतचे समन्स बजावले असल्याचं सांगितलं. या भूखंड प्रकरणात आपण इतर यंत्रणांना तपास करण्यासाठी ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रमाणे आपण ईडीलाही चौकशीसाठी सहकार्य करू असंही त्यांनी सांगितली. यावेळी खडसे यांना माध्यम प्रतिनिधींनी सीडी लावणार का? असे विचारले असता त्यांनी, ‘आधी ईडीचं बघू मग सीडीचं’ अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीबाबत बोलताना, “ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ईडी मागे लावते असं त्यांना वाटतंय का? ईडीची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न सीडी लावण्याचा तर तुम्ही खुशाल सीडी लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?” असं वक्तव्य केलं.