देहूगाव – करोनामुळे मागील दोन वर्षे वारकऱ्यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. परंतु यंदा वैष्णवांना हा पालखी सोहळा “याचि देही याची डोळां’ अनुभवता येणार आहे. यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याला श्रीक्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ वद्य सप्तमी सोमवार 20 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. 23 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी, तर 9 जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा 13 जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असून, सोहळ्याची 24 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे.
यंदा तुकोबारायांचा पालखी सोहळा पायी वारी होत असून, पालखी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने थोडाफार वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे, अशी माहिती श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी दिली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, हभप माणिक मोरे, विश्वस्त हभप संजय मोरे, हभप भानुदास मोरे, हभप अजित महाराज मोरे उपस्थित होते.
संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. पालखी सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपूर मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम होतील. तर, यंदा इंदापूर येथे पालखी तळावर दोन मुक्काम होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले, तर इंदापूरनंतर सराटी येथील अकलूज माने विद्यालय जवळ गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती येथे उभे रिंगण होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
असा आहे पालखी सोहळ्याचा मार्ग आणि नियोजन
दि. 20 जून ः देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान. पहिला मुक्काम श्रीक्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात.
दि. 21 जून ः आकुर्डी विठ्ठल मंदिर,
दि. 22 व 23 जून ः श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ पुणे,
दि. 24 ः लोणी काळभोर
दि.25 जून ः यवत
दि.26 जून ः वरवंड
दि. 27 जून ः उंडवडी
दि.28 जून ः बारामती शारदा विद्यालय,
दि. 29 जून ः सणसर (पालखी तळ),
दि. 30 जून ः दुपारचे बेलवडी गोल रिंगण.
नंतर आंथर्णे (पालखी तळ)
दि. 1 जुलै निमगाव केतकी (पालखी तळ)
दि. 2 जुलै इंदापूर येथे गोल रिंगण. दोन दिवस मुक्काम.
दि. 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण
दि. 6 जुलै ः माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव,
दि. 7 जुलैः तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली मुक्काम
दि. 8 जुलै ः बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी येथे मुक्काम.
दि. 9 जुलै ः पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान. रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.
दि. 10 जुलै ः नगर प्रदक्षिणा करून पालखी 13 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
दि.13 जुलै ः दुपारी परतीच्या प्रवासाला सुरूवात