मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच शिंदे समर्थक आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले. दरम्यान, मेळाव्यातील भाषणापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या एका विधानावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दसरा मेळाव्यातून मुंबई आणि महानगर क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे एकप्रकारे रणशिंगच या विधानाच्या माध्यमातून फुंकल्याचे चित्र पहायला मिळाले. या आपल्या पहिल्याच मेळाव्यात भाषणासाठी उभे रहाण्याच्या काही तासांपुर्वी म्हणजेच दुपारी चार वाजून २९ मिनिटांनी शिंदे यांनी एक ट्वीट केले होते. ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी शिंदेंनी ट्वीट केल्या होत्या. त्यांनी ‘विचारांचे वारसदार’ हा हॅशटॅगही वापरला होता. त्यांनी हे ट्वीट करत घराणेशाहीच्या मुद्दयावर ठाकरे पिता-पुत्रांची कोंडी करण्यासाठी वातावरण निर्मीती केली होती.
आपल्या मेळाव्यामधील भाषणामध्येही हाच मुद्दा पुढे नेत उद्धव यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काय केले असा सवाल करत शिंदे यांनी नोकर आणि मालकाचा संदर्भ देत केला. यामधून शिंदे यांनी शिवसैनिकांची सहानभूतीही मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यानंतर सायंकाळी आठच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरुन भाषणाला सुरुवात केली. मात्र उद्धव यांचे भाषण सुरु असतानाच अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंनी केलेले हे ट्वीट कोट करुन रिट्वीट करत प्रतिक्रिया नोंदवली.
“याच बदलाची आज महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे. आपल्या राज्याला आणि देशाला जो बदल पाहण्याची अपेक्षा आहे तो तुम्हीच आहात एकनाथ शिंदेजी,” असे अमृता यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.