माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कॉंग्रेस व्हेंटिलेटरवर

विधानसभा निवडणूक मुलाखतींना बगल : जिल्हाध्यक्षांचा निर्णय होईना

सम्राट गायकवाड

सातारा – महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेस अंतिम घटका मोजत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर एका बाजूला सत्ताधारी भाजप-सेना राज्यभर यात्रा काढत असताना दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसवर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती टाळण्याची वेळ आली आहे. एवढी नामुष्की ओढावण्यामागे रिक्त जिल्हाध्यक्षपद हे प्रमुख कारण आहे. मात्र, त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे सर्वात वाईट अवस्था सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होत आहे.

स्व.यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याने कॉंग्रेसच्या माध्यमातून राज्याला तीन मुख्यमंत्री दिले. त्यामध्ये माध्यमाची भूमिका निर्णायक आहे. कॉंग्रेसच्या सुवर्णकाळात तिन्ही सुपुत्रांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. मात्र, मागील पाच वर्षात सुवर्णकाळाचा जवळपास अस्त झाला. अशावेळी अनेक जण पक्ष सोडून गेले तर काही तयारीत आहेत. अशा स्थितीत जे सोडून पक्ष जाणार नाहीत, अशा कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींकडून कोणताही विचार होताना दिसून येत नाही.

विधानसभा निवडणूक जवळपास 60 दिवसांच्या तोंडावर आली आहे. अशावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक लढवू इच्छित उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला. दि.29 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलाखती झाल्या. मात्र, तीन मुख्यमंत्री दिलेल्या सातारा जिल्ह्यात मुलाखती होवू शकल्या नाहीत. सद्यस्थितीत कॉंग्रेसचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड-दक्षिण तर जयकुमार गोरे माण-खटावमधून प्रतिनिधीत्व करतात. आ.गोरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. त्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आ.गोरे यांनी स्पष्ट केले आहे. असे असताना कॉंग्रेसने मुलाखती टाळण्यामागचे नेमके कारण कोणते ? असा प्रश्‍न जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सतावत आहे. त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नसल्याने कार्यकर्ते आता पत्रकारांजवळ आपली खंत व्यक्त करू लागले आहेत.

राष्ट्रवादीने नुकतेच काही दिवसांपुर्वी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. वास्तविक आठपैकी पाच मतदारसंघात राष्ट्रवादीचे तर दोन मतदारसंघात कॉंग्रसेचे विद्यमान आमदार प्रतिनिधीनिधीत्व करतात. असे असताना राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या दोन्ही जागांवर डोळा ठेवून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोनच आमदार असल्यामुळे मुलाखती घेण्यात आली नाही, असे सांगून पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न पदाधिकारी करित आहेत.

पदाधिकाऱ्यांचा हा मुद्दा कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. कॉंग्रेसने आठ ही विधानसभा मतदारसंघात मुलाखती घेतल्या असत्या तर कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली असती. त्याचबरोबर भविष्यात कार्यकर्त्यांमधून आमदार देखील तयार झाला असता. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून कोणताच प्रयत्न झाला नसल्यामुळे कार्यकर्ता चिंताग्रस्त असून येत्या काळात तरी कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली अशी अपेक्षा कार्यकर्ते ठेवून आहेत.

 

बाबांना मौन सोडावे लागणार
राज्याचे साडे तीन वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविलेले पृथ्वीराज चव्हाण जिल्हा कॉंग्रेसची पडझड होत असताना मौन बाळगून आहेत. चव्हाणांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच जिल्हाध्यक्षपदी संधी दिलेले रणजितसिंह ना.निंबाळकर कॉंग्रेसची साथ सोडून भाजपचे खासदार झाले. सर्व घटनाक्रमावर केवळ प्रकार र्दुदैवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यानंतर देखील चव्हाण यांच्यांकडून कॉंग्रेसचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नाहीत. आ.जयकुमार गोरे व आ.आनंदराव पाटील यांच्यातील विसंवादात कॉंग्रेसचा अस्त होत आहे. तो रोखण्यासाठी चव्हाणांना प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ कराड दक्षिणपुरते मर्यादित न राहता आता जिल्हा कॉंग्रेसची सुत्रे चव्हाण यांना हाती घेतली तरच जिल्ह्यात कॉंग्रेस आणि कार्यकर्त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.

आ. जयकुमार गोरेंचा निर्णय योग्यच
माढा लोकसभा निवडणूकीत आ.जयकुमार गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह ना.निंबाळकर यांना पाठींबा दिला. त्यामुळे गोरेंचा पक्षांतर्गत विरोधी गट नाराजीचा सूर व्यक्त करित आहे. मात्र, माण-खटाव मतदारसंघात आ.गोरे तथा कॉंग्रेसच्या विरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीने कायम गोरेंर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात ही करणार आहे. त्यामुळे आ.गोरेंनी लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला नव्हे तर व्यक्तीला तथा मित्राला मदत केली. त्यामुळे आ.गोरेंनी घेतलेला निर्णय योग्यच होता, असे मत कार्यकर्ते व्यक्त करित आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.