ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी जनआंदोलनाची हाक

दि.14 डिसेंबर रोजी रसिक करणार काव्याचा जागर

पुणे – ग. दि. माडगूळकरांच्या जन्मशताब्दी वर्षात स्मारकाची घोषणा होऊन अद्याप त्याबाबत कार्यवाही न झाल्याने स्मारकासाठी कलावंत आणि रसिकांकडून जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या 43 व्या स्मृतीदिनी दि.14 डिसेंबर रोजी पुण्यासह देशाच्या आणि परदेशातील विविध भागांतून रसिक गदिमांच्या काव्याचा जागर करत आंदोलन करणार आहेत.

 

 

“आधुनिक वाल्मिकी’ अशी ओळख असणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी कलावंत आणि रसिकांकडून जनआंदोलन करण्यात येणार आहे. कोणत्याही घोषणा किंवा राजकीय पक्षांचा निषेध न करता होणाऱ्या या आंदोलनात गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रख्यात  गजलकार प्रदीप निफाडकर, डॉ. अविनाश सांगोलेकर, मनोहर सोनवणे आणि धनंजय तडवळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता टिळक चौकात गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर, शीतल माडगूळकर हे कवितावाचन करून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. यासह हिंजवडी, आळेफाटा आणि बारामती येथेदेखील हे जनआंदोलन होणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये तेथील साहित्यिक आणि रसिकांनी आंदोलनाची जबाबदारी घेतली आहे.

 

याखेरीज गोवा, भोपाळ आणि बंगलोरसह अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, नेदरलॅंड्स आणि इटली या देशातील मराठी बांधवही तेथे आंदोलन करणार आहेत. साहित्यिक, कलाकार, लोककलावंत, चित्रकार असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या आंदोलनात सहभाग घेत स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दर्शविणार आहेत, असे निफाडकर म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.