पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने एज्युकेशन फेअर व करिअर गाईडन्स मेळाव्याचे दि. 9 व 10 जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या “टिमवि’ने आधुनिकतेची कास धरणाऱ्या शिक्षणाची परंपरा कायम जपली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर विद्यार्थ्यांना नोकऱ्या व व्यवसाय उपलब्ध करून देणाऱ्या कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम “टिमवि’मध्ये आहेत.
दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक अभ्यासक्रम “टिमवि’च्या एकाच छताखाली सुरू आहेत. आयुर्वेद, संस्कृत, जपानी भाषा, मास कम्युनिकेशन विभाग, मॅनेजमेंट, डिजिटल आर्टस्, हॉटेल मॅनेजमेंट, इंडोलॉजी, सोशल वर्क, सोशल सायन्स, स्किल डेव्हलपमेन्ट, नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, लॉ, कॉमर्स, संगणक शास्त्र, शालेय प्रसार आदी अभ्यासक्रम तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली येथे सुरू आहेत.
सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांची मानसिक कल चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रम निवडण्यास मदत व्हावी म्हणून प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांचे प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्देशानुसार एका पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यावर त्याचवेळी त्याला दुसऱ्या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेता येईल. या मेळाव्यादरम्यान पदवी, पदविका, डिप्लोमा या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात विशेष सवलत देण्यात येणार आहे.