9 ऑगस्ट रोजी “पेसा’अंतर्गत गावांना सुट्टी जाहीर करा

मंचर – जिल्ह्यातील पेसा अंतर्गत गावांना 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केल्याची माहिती आदिवासी जिल्हा अध्यक्ष विजय अढारी यांनी दिली.

राज्यपाल व जिल्हाधिकाऱ्यांना आढळराव पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे की, जिल्ह्यात सुमारे 125 हून अधिक गावे ‘पेसा’ अंतर्गत येत असून यामध्ये प्रामुख्याने जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील गावांचा समावेश होतो. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने सर्व आदिवासी बांधव साजरा करतात. मात्र, दिवशी शासकीय सुट्टी नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना साजरा करता येत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर केली आहे, त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातील “पेसा’ अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आढळराव पाटील यांनी केली आहे. “पेसा’ अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी गावांमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा व्हावा यासाठी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशा स्वरूपाची मागणी राज्यपालांना केल्यामुळे सर्व आदिवासी समाजाच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे विजय आढारी यांनी यावेळी अभिनंदन व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.