दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’चा धुमाकूळ ; देशात लॉकडाउनचे संकट अन् विमातळांवर गोंधळाचे वातावरण

नवी दिल्ली :  दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर मोठा  परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत या परिस्थितीत कडक लॉकडाउनची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमानांवर बंदी घालण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी करोनाच्या नव्या  विषाणूचा अर्थात ओमिक्रॉनचा शोध लागल्याचे जाहीर केले. यानंतर धास्तावलेल्या देशांनी येथून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील काही देशांचा समावेश आहे.

अलजझीरा च्या वृत्तामुसार, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात व्यस्त विमानतळ OR Tambo वर अडकलेले स्टीव्ह लॉरेन्स यांनी, हा खूप मोठा गोंधळ असून कोणीही आम्हाला सध्या प्रवासाची काय स्थिती आहे याबद्दल सांगत नसल्याचे म्हटले आहे. “प्रत्येक मिनिटाला गोष्टी बदलत असून आम्ही हतबल स्थितीत आहोत. आम्ही डिसेंबर महिन्यात अमेरिकेत राहण्याचं ठरवलं होतं, पण आता आम्ही अडकलो आहेत,” असे ते म्हणाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत करोनाचे रुग्ण नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान देशांनी निर्बंध घातल्याने दक्षिण आफ्रिका सरकार आणि तेथील नागरिकांनी नाराजी जाहीर केली आहे. लसशास्त्रज्ञ शबीर  यांच्या म्हणण्यानुसार, “दक्षिण आफ्रिकेसारख्या देशावर पूर्ण बंदी घालून करोनाच्या नव्या विषाणूला आपण रोखू शकतं असा विचार विकसित देशांनी करणं मूर्खपणाचं आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रवास न कऱणाऱ्या किंवा संपर्कात न आलेल्यांनाही लागण होत असून नव्या विषाणूने आधीच आपला मार्ग शोधला आहे”.

“दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूचा शोध लागला याचा अर्थ तो येथील विषाणू आहे असा होत नाही. करोनाच्या नव्या विषाणूचा शोध लावण्यात आम्ही यशस्वी झालो ही आमची चूक आहे का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

दरम्यान विमानसेवा ठप्प होत असल्याने पर्यटनालाही मोठा फटका बसत असून कोट्यवधींचे  नुकसान होण्याची भीती आहे. २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेला १० बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.