नागपुर – कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले होते.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांना व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही. पत्रकारांनी चीनमध्ये थैमान घालणाऱ्या बीएफ-७ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत प्रश्न विचारला असता उत्तर देताना सावंत यांनी ओमायक्रॉनचा उल्लेख ‘एमिक्रॉन’ असा केला.
त्यानंतर आपला उच्चार चुकल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना या व्हेरिएंटचं नेमकं नाव काय आहे हे नजर आणि देहबोलीमधूनच विचारलं. त्यावर सहकाऱ्यांनी ‘ओमिक्रॉन… ओमिक्रॉन…’ असं म्हणत मदत केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना या व्हेरिएंटचं बरोबर नाव घेता आलं. सावंतांनी ओमिक्रॉनच्या ऐवजी ‘एमिक्रॉन’ असा उच्चार केला अन् स्वत:च थांबून अधिकाऱ्यांना नेमका शब्द विचारला. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.