मुंबई-दक्षिण आफ्रिकेत उद्भवलेल्या ओमीक्रॉन या करोना व्हायरसमुळे दिवसभर शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या मंद लाटा होत्या. मात्र तरीही काही कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकात माफक वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकांनी वाढून 57,260 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 अंकांनी म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढून 17,053 अंकावर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांन्ना आधार मिळाला.
इन्फोसिस, एचसीएल टेक, एसीसी, एचडीएफसी बॅंक, बजाज फायनान्स, टायटन या कंपन्यांच्या शेअरनी आगेकूच केली. तर सन फार्मा, ऍक्सिस बॅंक, एनटीपीसी, नस्ले, बजाज ऑटो, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला. तंत्रज्ञान, माहीती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू या क्षेत्रांचे निर्देशांक 0.67 टक्क्यांपर्यंत वाढले. तर रिऍल्टी, ऊर्जा, तेल आणि नैसर्गीक वायू, या क्षेत्रांचे निर्देशांक 2.61 टक्क्यांपर्यंति कमी झाले. त्याचबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारीत स्मॉल कॅप व मिड कॅप 1.90 टक्क्यापर्यंत कोसळले.
रेलीगेअर ब्रोकींग या संस्थेचे विश्लेषक अति मिश्रा यांनी सांगितले की, ओमिक्रॉन कसे रुप धारण करतो याचा अंदाज सध्या कोणालाच येते नसल्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात वाहन विक्री, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई इत्यादीची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर गुंतवणूकदार आगामी काळत खरेदी – विक्रीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
करोनामुळे जपान, चीन, दक्षिण कोरिया या देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. करोनामुळे जागतीक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 5,785 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
तेजी- मंदीचा अंदाज
रिलायन्स इंडस्ट्रीजमधील जिओ कंपनीने मोबाईल सेवा दर वाढविल्यामुळे या कंपनीचा नफा वाढण्याची शक्यता आहे. भारती एअरटेल कंपनीच्या नफ्यातही याच कारणामुळे वाढ होणार आहे. कोटक बॅंकेतील बरेच भागभांडवल एलआयसी खरेदी करणार आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आगामी काळातही या तीन कंपन्याकडे गुंतवणूदारांचा ओढा कायम राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबर औषधी कंपन्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
नव्या करोनामुळे बाजारावरील तांत्रिक परिणामाचे मूल्यांकन करणे अवघड आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष चंदन तपारिया यांनी सांगितले की, जर निफ्टी 17,200 अंकांखाली बराचा काळ राहीला तर तो 16,500 पर्यंत घसरू शकतो. तर निफ्टीला 17,350 व 17,500 अंकावर चांगला आधार आहे.