नवी दिल्ली – ओमायक्रॉन देशात वेगाने पसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात प्रथमच 122 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. म्हणजेच दर तासाला सरासरी 5 रुग्ण येत आहेत. देशातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांची संख्या बघून चिंता व्यक्त केली जात आहे.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या 358 रुग्णांपैकी 114 रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासादायक बाब जरी असली तरी रुग्णांचा आलेख वाढत जात आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनची 358 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमाक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक 88, दिल्लीत 67, तेलंगणात 38, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटकात 31 आणि गुजरातमध्ये 30 प्रकरणे आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 650 नवे रुग्ण आढळले असून 374 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 516 वर आली आहे. आतापर्यंत देशात 140.31 कोटीहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.