श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. आता त्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उमर यांचा शपथविधी १६ ऑक्टोबरला होईल.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने बाजी मारली. त्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सने ११ ऑक्टोबरला नायब राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, जम्मू-काश्मीरात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने सरकार स्थापनेची प्रक्रिया काहिशी रखडली.
अर्थात, रविवारी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आल्यानंतर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आता उमर आणि इतर मंत्री बुधवारी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसकडे स्पष्ट बहुमत असणारे संख्याबळ आहे. मात्र, सत्तारूढ आघाडीची स्थिती आणखी भक्कम करण्यासाठी इतर लहान पक्षांचा आणि अपक्षांचाही पाठिंबा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे जाणार, कोण मंत्री बनणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.