काश्मीर : जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती कायम आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काश्मीरमधल्या राजकीय घडामोडींबाबत फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान नजरकैदेच्या कारवाईवर मेहबुबा मुफ्ती यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही शांतीच्या मार्गाने जाणारे नेते आहोत आम्हाला आमच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे ही बाब निषेधार्ह आहे अशा आशयाचे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. तसंच आज आपल्याला अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाल्याचं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर ओमर अब्दुल्ला यांनीही या कारवाईचा निषेध करत आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे आम्हाला आज ठाऊक नाही आम्ही मात्र काश्मीरच्या जनतेला शांततेचं आवाहन करत आहोत या आशयाचं ट्विट केलं आहे.