Omar Abdullah – Congress। आज जम्मू-काश्मीरच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे आज नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे याच सोहळ्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी होण्यास नकार दिल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस हायकमांडने ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बाहेरून पाठिंबा कायम राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती झाली होती. याच आघाडीने विजय देखील मिळवला होता.
दुसरीकडे, कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीच्या विजयानंतर अब्दुल्ला आज जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा सकाळी 11.30 वाजता शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
खरगे, राहुल आणि प्रियांका गांधीही राहणार उपस्थित Omar Abdullah – Congress।
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने माध्यमांशी बोलताना, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. मात्र, काँग्रेसने मंगळवारी शपथविधी सोहळ्यापूर्वी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
काँग्रेसच्या नाराजीचे ‘हे’ आहे कारण ? Omar Abdullah – Congress।
शपथविधी सोहळ्याच्या ४८ तास आधी सरकारमध्ये सहभागी न होण्याच्या काँग्रेसच्या निर्णयानंतर आता सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत. ओमर अब्दुल्ला सरकारमध्ये एकच मंत्रिपद मिळाल्याने काँग्रेस नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाला किमान दोन मंत्रीपदे हवी होती, पण अब्दुल्ला यांना हे मान्य नव्हते.