CAS Verdict on Ana Barbosu Gymnastics :– क्रीडा लवादा अर्थात ‘कॅस’ने विनेश फोगट सारख्याच एका प्रकरणात दिलेल्या निकालानंतर फोगटला रौप्य पदक मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. कॅसने रोमानियाची जिम्नॅस्ट अॅना बारबोसू हिला आनंदाची बातमी दिली आहे. जिम्नॅस्टच्या फ्लोर इव्हेंटमध्ये अॅना पराभूत झाली होती. तरीदेखील तिला कांस्यपदक जाहीर झाले आहे. यासह न्यायालयाने अमेरिकेची जिम्नॅस्ट जॉर्डन चाइल्सला जाहीर केलेले कांस्य पदक रद्द केले आहे. या स्पर्धेत जॉर्डन तिसऱ्या तर अॅना चौथ्या स्थानी होती. जॉर्डनला आता तिचे पदक अॅनाला द्यावे लागणार आहे.
जिम्नॅस्टच्या फ्लोर इव्हेंटच्या अंतिम फेरीत जॉर्डनने १३.७६६ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले होते. यासह ती गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे कांस्य पदक देऊन तिचा गौरव करण्यात आला. तर अॅना १३.७०० गुणांसह चौथ्या स्थानावर होती. मात्र अॅना व रोमानियाच्या ऑलिम्पिक समितीने याप्रकरणी क्रीडा लवादाकडे धाव घेतली. त्यानंतर लवादाने अॅनाला कांस्यपदक दिले जावे असा निकाल दिला आहे.
अॅनाने दावा केला होता की, जॉर्डनने चुकीच्या पद्धतीने गुण मिळवले होते. त्यामुळे ती तिसरा क्रमांक मिळवू शकली. अॅनाने लवादासमोर जॉर्डनचा खोटेपणा सिद्ध केला. याप्रकरणी प्रदीर्घ सुनावणी झाली आणि अखेर लवादाने अॅनाच्या बाजूने निकाल दिला आहे.
अन् न्यायालयाने जॉर्डनचे गुण कमी केले…
या सुनावणीनंतर ‘कॅस’ने जॉर्डन चाइल्सचे गुण कमी केले आहेत. ‘कॅस’ने दिलेल्या माहितीनुसार अंतिम फेरीत जॉर्डनने १३.६६६ व अॅनाने १३.७०० गुण मिळवले होते. गुण कमी झाल्याने जॉर्डन थेट पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. तर अॅना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासह न्यायालयाने अॅनाला कांस्य पदक जाहीर केले. दरम्यान, जिम्नॅस्टिकच्या फ्लोर इव्हेंटमध्ये ब्राझीलच्या रेबेका आंद्रेडे हिने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर अमेरिकेच्या सिमोने बिलेसने रौप्य पदक जिंकले.