टोकियो – ऍलेक्झांडर ज्वेरेव याने जर्मनीला यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरी टेनिसचे सुवर्णपदक मिळवून दिले.
याआधी टेनिसच्या एकेरी गटात जर्मनीला 1988 साली महान महिला टेनिसपटू स्टेफी ग्राफने सुवर्णपदक मिळवून दिले होते.
त्यानंतर तब्बल 33 वर्षांनंतर ज्वेरेवने ही कामगिरी केली आहे. 1992 साली बोरीस बेकर व मायकेल स्टीच या जोडीने दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले होते.
या पदकामुळे टेनिसमध्ये जर्मनीने 29 वर्षांनंतर पदक जिंकले आहे. सोमवारी झालेल्या पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत ज्वेरेव याने करेन खाचानोव याला 6-3, 6-1 असे पराभूत केले. खाचानोवला रजतपदकावर समाधान मानावे लागले.