ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत ऑलिंपिकदिन उत्साहात साजरा

पुणे – माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदान शहारून गेले. ऑलिंपिक दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित ऑलिंपियन विरुद्ध महाराष्ट्र इलेव्हन या सामन्याद्वारे चाहत्यांना हॉकीचा आनंद मिळवून दिला.

पुरुष आणि महिला अशा संमिश्र खेळाडूंसह हा सामना खेळविला गेला. चारवेळचा ऑलिंपियन धनराज शहासह आठ अन्य माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघाने महाराष्ट्र इलेव्हन संघावर 3-2 असा विजय मिळविला. या सामन्याच्या निमित्ताने हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या नावाने असलेले मैदान खूप काळाने हॉकीमय झाले होते. कुठलीही स्पर्धा नसल्याने हॉकीचा निखळ आनंद या सामन्यात घेतला गेला. ज्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गाजवले त्या खेळाडूंचा खेळ थेट बघण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद उपस्थित प्रेक्षकांना झाला होता. घरच्या मैदानावर आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसमोर खेळताना खेळाडू देखील हरखून गेले होते.

वयाच्या पन्नाशीतही आपण स्टार असल्याचे धनराजने दाखवून दिले. महंमद रियाज, (1992, 2000 ऑलिंपिक), अजित लाक्रा (1992 ऑलिंपिक), राहुल सिंग (1996), समीर दाड (2000), विक्रम पिल्ले (2004) अशा वलयांकित खेळाडूंनी आपल्या कौशल्याचा प्रत्यय घडविला. धनराजच्या ऑलिंपियन संघात तुषार खांडेकर (2012) याच्यासह रेणुका यादव, प्रीती दुबे (2016) या महिला खेळाडूंचा देखील समावेश होता. महाराष्ट्र इलेव्हन संघात मात्र राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या पुरुष, महिला खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना ज्येष्ठ खेळाडूंकडून हॉकीचे मौलिक धडे मिळाले.

वाढत्या वयांत वेगवान मैदानावर अधिक धोका न पत्करता व्यावसायिक खेळ दाखवणे पसंत केले,’अशी प्रतिक्रिया राहुल सिंग याने व्यक्त केली. मी या सामन्यात खेळलो नाही, पण एकाच मैदानावर इतके सारे माजी ऑलिंपियन्सना खेळताना पाहून भारावून गेलो. हॉकी महाराष्ट्राच्या या उपक्रमामुळे चाहत्यांना देखील त्यांच्या आदर्श खेळाडूंना जवळून पाहता आले.,’अशी प्रतिक्रिया माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू एडगर मस्करेन्हास याने व्यक्त केली. या वयातही धनराजच्या चपळपणात कुठेच कमतरता दिसून आली नाही.

धनराजने सांगितले की,माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. ज्या खेळाडूंबरोबर खेळलो त्या जुन्या खेळाडूंचा सहवास या निमित्ताने लाभला. मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की मला या वेळी देखील त्यांची साथ करता आली.’

ऑलिंपियन्स संघाकडून समीर दाड या एकमेव ऑलिंपियनने गोल केला. अजित शिंदेने सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर युवराज वाल्मिकीने ऑलिंपियन्स संघाचा विजय साकार केला.

या सोहळ्यास महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनिष आनंद, उपाध्यक्ष जसिंता जाधव, खझिनदार पराग ओझा, प्रायोजक कविता रतिश, खडकी कॅटोन्मेंट बोर्डाच्या सदस्या पूजा आनंद, हॉकी महाराष्ट्रचे सहसचिव फिरोज शेख, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे जनसंपर्क अधिकारी भगवान परदेशी, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे प्रमुख कपिल कोहली, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे उपस्थित होते.

सविस्तर निकाल :

ऑलिंपियन इलेव्हन 3 (गुरमित राव 21वे, समीर दाड 32वे, युवराज वाल्मिकी 58वे) वि.वि. महाराष्ट्र इलेव्हन 2 (अजित शिंदे 43, 52वे मिनिट)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)