मिथकीय कल्पनांची वैश्‍विक कथाकार ओल्गा टोकारजूक

मिथकं, त्यांची ताकद आणि माणूस नि त्याच्या सभोवताली दडलेली त्या मिथकांची मुळं याची उकल करणाऱ्या कथाकार म्हणजे ओल्गा टोकारजूक. केवळ कथा लिहून त्या थांबत नाहीत, तर वाचकांना त्या मिथकाभोवती रुजलेल्या भावनांच्या खोलात नेतात…
कवयित्री, निबंधलेखिका, पटकथाकार आणि मानसशास्त्रज्ञ अशा चौमुखी प्रतिभेच्या धनी असलेल्या ओल्गा टोकारजूक यांची ओळख करून द्यायची तर त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे अनेक पदर उलगडून दाखवावे लागतील. कार्ल यंग यांना गुरू मानणाऱ्या आणि त्यांच्या मानसशास्त्रीय विश्‍लेषणातून प्रेरणा घेणाऱ्या ओल्गा यांचा जन्म 29 जानेवारी 1962 रोजी पोलंडमध्ये झाला. कुटुंबात शिक्षकांची परंपरा असलेल्या ओल्गा यांचं बालपण खेड्यात गेलं. तिथं खेड्यातली व्यवस्था, लोकजीवन याबद्दल त्यांना आकर्षण वाटू लागलं. त्यातले अनेक बारकावे त्यांच्या मनावर कोरले गेले. लहानपणापासून वडिलांकडून ऐकलेल्या लोककथांमधून त्यांच्यात लिखाणाची सुप्त प्रेरणा निर्माण झाली.

पुढं कुटुंबीयांसोबत वॉर्सा इथं स्थायिक झाल्यावर त्यांनी वॉर्सा विद्यापीठात मानसशास्त्रात पदवी घेतली. पदवीनंतर मानसशास्त्रज्ञ म्हणून काही काळ नोकरीही केली, पण तिथं त्यांचं मन रमलं नाही नि त्यांनी ती नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात वॉर्सा विद्यापीठातील सहकारी रोमन फिनागास यांच्यासोबत त्यांनी “पब्लिशिंग’ ही प्रकाशन संस्था चालवली. 1986 नंतर त्यांनी लिहायला सुरुवात केली. महाविद्यालयातल्या साहित्यिक स्पर्धांमध्ये त्यांना यश मिळू लागलं. आसपासच्या काही मासिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या. 1989 मध्ये त्यांचा “सिटीज इन अ मिरर’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांच्या लेखणीतून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला.

“द जर्नी ऑफ द बुक पीपल’ (1993), “प्रायमिव्हल अँड अदर टाइम्स’ (1996), “हाउस ऑफ डे, हाउस ऑफ नाइट’ (1998), “द लास्ट स्टोरीज’ (2004), “फ्लाइट्‌स’ (2007), “ड्राइव्ह युवर प्लाव ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ (2009), “द बुक्‍स ऑफ जेकब’ (2014) या कादंबऱ्यांसोबत “बीटिंग ऑन मेनी ड्रम्स’ हा लघुकथासंग्रह ओल्गा यांच्या नावावर आहे. त्यांना पटकथालेखनासाठीही आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे.

ओल्गा यांच्या “फ्लाइट्‌स’ या कादंबरीला मॅन बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर लेखिका म्हणून त्यांची जगाला ओळख झाली. “प्रायमिव्हल अँड अदर टाइम्स’ या कादंबरीत त्यांनी पौराणिक काळात मानवी अस्तित्वाबद्दल भाष्य केलंय. यातली त्यांची मिथकाला स्पर्श करीत कथा पुढे नेणारी कथनशैली विलक्षण आहे.

“फ्लाइट्‌स’ कादंबरीतही त्यांनी जीवन आणि मृत्यूबद्दलची एक कथा अशाच मिथकाच्या कथनशैलीतून उघड केलीय. ही कादंबरी म्हणजे 116 छोट्या-छोट्या कथांचा समुच्चय आहे. त्यातल्या काही खूपच छोट्या लघुकथा आहेत तर काही दीर्घकथा. प्रवास या एकाच सूत्राबद्दलच्या या कथा एक निनावी स्त्री कथन करतेय. ही स्त्री सनातनी ख्रिस्ती धर्म मताची अनुयायी आहे. सैतान किंवा अरिष्ट टाळायचं असेल तर सतत प्रवास करत राहावा, अशी तिची गाढ श्रद्धा आहे. या कथांपैकी काही अत्यंत आधुनिक कथांसारख्या भासतात तर काही ऐतिहासिक कल्पक कथांसारख्या वाटतात. प्रवासाच्या सोबतच यातल्या काही कथा प्रवासामागचं मानसशास्त्र, शरीररचनाशास्त्र आणि अगदी शरीरविच्छेदनासारख्या बाबींपर्यंतही जाऊन पोचतात. या कादंबरीचा हा विस्तीर्ण पट, त्यातली गुंतागुंत आणि रहस्यमयता हीच या कादंबरीची सौंदर्यस्थळं आहेत.

ओल्गा यांनी एका नव्या लेखन-कथनशैलीचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून केला आहे. एका मिथकाचा आधार घेऊन त्याभोवती कथा गुंफत रहस्याचा एकेक धागा उलगडत जाण्याची ही शैली वाचकाला अद्‌भुत अनुभूती देणारी आहे. मिथक, कल्पना यासोबतच निबंध, गद्य असे प्रयोगही त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांत केलेत.

ओल्गा यांच्या कादंबऱ्यांमधल्या कथा आणि कथानकं स्वतंत्र आहेत. पण त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये एक सूत्र दिसतं. एका दोऱ्यात वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, पोताचे मणी ओवावेत तशा त्या भासतात. एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या पण एका निश्‍चित, ठाम विचाराच्या सूत्ररूपी दोराने एकमेकांशी जोडलेल्या अशा त्या भासतात. ओल्गा यांची पात्ररचनाही खूपच आगळी आहे. पारंपरिक कादंबऱ्यांपेक्षा त्यांच्या कादंबऱ्या वेगळ्या ठरतात त्या यामुळेच.

माणसाचं जीवन हे प्रत्येक थेंब नखशिखांत जगण्यासाठी आहे. पण माणसं सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे पळत असतात. एक गोष्ट मिळाली की दुसऱ्या गोष्टीचा पाठलाग करतात. ही माणसाची वृत्ती त्याच्या जीवनाची अनिश्‍चितता नि त्याच्या अस्तित्वाची अनिरंतरता ठाशीवपणे दाखवून देते, ही बाब ओल्गा यांना आकर्षित करते.

एक समीक्षक आणि अनुवादक म्हणूनही ओल्गा यांनी पोलिश साहित्यावर आपली नाममुद्रा उमटवली आहे. समीक्षेचं असं अंग असल्यामुळेच त्यांच्या साहित्याला वाचकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळाली. त्यांच्या साहित्यकृतींना अगदी सुरुवातीपासूनच पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. पोलिश पब्लिशर्स असोसिएशनचे पारितोषिक (1993), नाईके पारितोषिक (2008), बुकर पारितोषिक (2017) यांच्यासह काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.

लेखनासोबतच त्यांनी कार्यकर्ता आणि मानवतावादी चळवळींच्या पाठीराख्या म्हणूनही योगदान दिलंय. पोलंडच्या इतिहासाची चिकित्सा करण्याच्या प्रयत्नाबद्दल ओल्गा यांना टीकेला तोंड द्यावं लागलं. ही टीका करण्यात उजव्या विचारसरणीचे लोक आघाडीवर होते.
ओल्गा या डाव्या विचारसरणीशी आपली नाळ जोडून आहेत. शाकाहारी, देव-दैवविरोधी आणि स्त्रीवादी भूमिकांचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला आहे. पोलंडमधल्या काही समूहांनी त्यांच्यावर ख्रिस्तीधर्मविरोधी, राष्ट्रद्वेषी असल्याची टीकाही केली, पण त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडत त्या टीकेतला फोलपणा उघड केला. याविषयी आपण खऱ्या देशभक्‍त असून, अशाप्रकारच्या विखारी आणि खोट्या टीकेमुळे आपल्यासोबत संपूर्ण पोलंड देशाचं नाव जगात बदनाम होतंय, असं त्यांनी म्हटलंय. “मानवी जीवन आणि अस्तित्वाच्या सर्वच सीमारेषा पार करण्याचं प्रतीक बनलेल्या कथनात्मक कल्पनाशक्‍तीच्या वैश्‍विक समर्पणासाठी’ हा पुरस्कार ओल्गा टोकारजूक यांना प्रदान करत आहोत, असं नोबेल पारितोषिक निवड समितीनं 2018 मध्ये हे पारितोषिक प्रदान करताना म्हटलंय.

-डॉ. भालचंद्र सुपेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.