जोधईया बाई बैगा यांच्या पेंटिंगचे इटलीत भरले प्रदर्शन
नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात अनेक दु:ख आहेत असे म्हणून खचून जाणाऱ्यांची संख्या जगात खूप आहे परंतू, आपल्या पदरी आलेल्या दु:खाला बाजुला सारून नव्याने आयुष्य जगणाऱ्यांची संख्या तशी मोजकीच असते. अशाच मोजक्या लोकांमध्ये एका 80 वर्षांच्या आदिवासी आजीचा समावेश झाला आहे. कारण पतीच्या निधनानंतर अविश्वसनीय वाटावा असा लौकिक या 80 वर्षांच्या आजीने मिळवला आहे. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या जोधईया बाई बैगा असे त्यांचं नाव आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी काढलेल्या पेटिंग आता इटलीतल्या मिलन येथे सुरू असलेल्या प्रदर्शनात लावण्यात आल्या आहेत.
जोधईया बाई बैगा या मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील लोहरा गावात राहतात. चाळीस वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. या दुःखाने कोलमडून न जाता त्यांनी स्वतःतील कलागुणांकडे लक्ष दिले. त्यानंतर सलग चार दशकांपासून त्या पेटिंग काढत आहेत. त्यांच्या या पेटिंग सातासमुद्रापार पोहोचल्या असून, इटलीतील मिलन येथे सुरू असलेल्या प्रदर्शनात लागल्या आहेत. प्रदर्शनात पेटिंग लागल्यानंतर जोधईया बाई बैगा म्हणाल्या,चाळीस वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मी चित्र काढण्यास सुरूवात केली. माझ्या आजूबाजूला जे दिसेल त्याची आणि सर्व प्राण्यांची चित्रे काढली. चित्र काढण्यासाठी मी भारतातील अनेक भागात फिरले. आता मी पेटिंगशिवाय दुसर काहीही करत नाही. कुटुंबाच्या उदरर्निवाह करण्यासाठी मी इतर काम केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या पेटिंग लागल्याचा प्रचंड आनंद होत आहे.