हवेली तालुक्यातील जुन्या समस्यांना आता नवा मुलामा
सोरतापवाडी – पुणे शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार हवेली तालुक्यातुन सुरू होते. हवेली तालुक्याचा मोठा भाग पुणे शहरामध्ये सामिल झालेला आहे. हवेली तालुका हा पुणे जिल्ह्यात सर्वदृष्टीने मोठा तालुका आहे. तालुका मोठा तश्याच समस्या पण मोठ्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हवेली तालुक्याला जोडलेल्या मतदारसंघात तीन आमदार निवडून आले आहेत.
पुरंदर- हवेलीतून संजय जगताप, शिरूर- हवेलीतून अशोक पवार तर हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे हे आमदार झाले आहेत. हे तीनही आमदारांना अजूनही जुन्या समस्यांचा निपटारा करावयाचा आहे. त्यामुळे समस्यांचा शिवधनुष्य पवार, जगताप, तुपे कसे हाताळणार, याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.
चेतन तुपे व संजय जगताप पहिल्यांदा तर अशोक पवार दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. या आमदारांच्या मतदारसंघातील रस्ते, कचरा व वाहतूक समस्या जुन्याच आहेत. त्या आमदारांना आव्हान देणाऱ्या आहेत. हडपसर मतदारसंघात मांजरी येथील रस्ते व कचरा समस्या प्रचंड आहेत. महादेनगर परिसरात पाण्याची समस्या कित्येक वर्षे तशीच आहे. आण्णासाहेब मगर कॉलेजजवळील कचरा समस्या तशीच आहे.
कॉलेजजवळील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर कित्येक वर्षे डांबर टाकले नसल्याचे रस्त्याकडे बघितल्यावर कळते. सोलापूर महामार्गावर मांजरी हद्दीतील मांजरी बाजाराशेजारील कचरा रस्त्यावरच पडलेला असतो. हडपसर येथील वाहतूक कोंडी सोडविण्याचे सर्वात मोठे आव्हान आमदार तुपे यांच्यासमोर असणार आहे.
शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांना तर प्रचंड प्रमाणात आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करणार का, हा संशोधनाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या ऊसासाठी दुसरे काय करणार, हे आव्हान महत्वाचे ठरणार आहे. पूर्व हवेलीतील रस्त्याची समस्या प्रचंड आहे. नगर महामार्ग व सोलापूर महामार्गावरील वाहतूक समस्या प्रचंड आहे. सोलापूर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. विद्यार्थी,नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.
थेऊर रस्ता व ऊरुळी कांचन ते जेजुरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. ते चांगल्या दर्जाचे करायचे आव्हान अशोक पवार यांच्यापुढे आहे. सोलापूर महामार्गावरून जाताना वाहतूक कोंडीमध्ये चार- चार तास अडकून बसावे लागत आहे. ऊरुळी कांचन येथील चौकात उडाणपुलाची मागणी नागरिकांनी केली आहे. पूर्व हवेलीत कचरा समस्या मोठ्या प्रमाणात आहे. एका मोठ्या कचरा प्रकल्पाची या भागात गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायतींशी समन्वय साधून हे सर्व प्रश्न सोडवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पुरंदरच्या डोईवर समस्यांचे ओझे – पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा मतदारसंघ हा शहरी म्हणजे फुरसुंगी येथेली भेकराईनगर येथून सुरू होतो. या परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत, हा पालखी मार्ग आहे. कित्येक वर्षे दुरावस्थेत आहे. भेकराईनगर, रेल्वे उड्डाणपूल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची चौक ते दिवेघाट भागात सतत वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले आहेत.
कचरा डेपोची समस्या अधूनमधून डोक वर काढते. आमदार संजय जगताप यांना पालखी मार्गवरील वाहतूक समस्या प्रथम सोडवावी लागणार आहे. हा पालखी मार्ग जनतेसाठी कसा सुकर होईल, याकडे जगताप यांना लक्ष द्यावे लागणार आहे.