पुणे – घाऊक बाजारात जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 रूपयापर्यंत पोहचले आहेत. हे दर सुमारे महिनाभर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व विक्रेत्यांनी वर्तविला आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला 55 ते 65 रूपये दर मिळत आहे. तर नवीन कांद्याला 30 ते 45 रूपये दर मिळत आहे. बाजारात 10 ते 15 ट्रक जुन्या कांद्याची, तर 30 ते 35 ट्रक नवीन कांद्याची आवक होत आहे. नवीन कांद्याची आवक श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथून होत आहे.
तर जुन्या कांद्याची आवक जुन्नर, मंचर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातून होत आहे. जोपर्यंत चांगल्या प्रतीच्या नवीन कांद्याची बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत हे दर स्थिर राहतील. आवक वाढल्यानंतर जुन्या कांद्याच्या दरात घट होईल. अशी माहिती मार्केटयार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
पोमण म्हणाले, मागील काही दिवसांपासून बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र त्याचा दर्जा खालावलेला आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात चांगल्या प्रतीचा नवीन कांदा बाजारात दाखल होईल. आवकेतही मोठी वाढ होईल. त्यानंतर मात्र जुन्या कांद्याच्या दरात घट होईल. आणि तोपर्यंत जुना कांदाही बर्यापैकी संपलेला असेल.
सद्य:स्थितीतही शेतकर्यांच्या वखारीत असलेला जुना कांद्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळेच दरात वाढ झाली आहे. नवीन लाल हळवी कांद्याचा हंगाम मार्चपर्यंत असतो. त्यानंतर मात्र गरवी कांद्याचा हंगाम सुरू होतो. असेही रितेश पोमण यांनी नमूद केले.
दक्षिण भारतातून मागणी
पुणे विभागातील कांद्याला दक्षिण भारतातून कायम मागणी असते. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून मागणी आहे. यासह पुणे शहर, परिसरातूनही कांद्याला मागणी आहे. बाजारात दाखल होणार्या जुन्या कांद्याचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात वाढ झाली आहे.