जुन्या कोयना पूलावरुन कऱ्हाडात हलकी वाहने जाऊ शकणार

जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला अरेस्टरची उभारणी

कराड- येथील जुन्या कोयना पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाने तयारी पूर्ण केली आहे. अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट अरेस्टर उभारले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा पूल हलक्या वाहतुकीसाठी सज्ज झाला असून या पुलावरून दुचाकींसह रिक्षा, चारचाकी आदी वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर कोल्हापूर नाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

जुना कोयना पूल हा ब्रिटिशकालीन असून पुणे-बंगलोर महामार्ग व कराड शहराला जोडणारा आहे. मात्र, हा पूल कमकुवत झाल्याच्या कारणावरून गेल्या काही वर्षापासून (1976 पासून) या पुलावरून फक्त दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे महामार्गावरून शहरात येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची कोल्हापूर नाका मार्गे वर्दळ सुरू होती. त्यामुळे कोल्हापूर नाका परिसरात अनेकदा वाहतुकीची कोंडी व अपघाताचे प्रकार घडत होते.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जुन्या कोयना पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. पुलाच्या वजन पेलण्याच्या क्षमतेचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर बांधकाम विभागाने जुना कोयना पूल हलक्या वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सांगितले. पुलावरून हलकी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाला पोलीस प्रशासनाने काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांना अटकाव करण्यासाटी हाईट अरेस्टर उभारले आहेत. आता 10 तारखेला होणार्‍या बैठकीनंतर कराड शहर पोलीस प्रत्यक्षात पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.