जुन्या घराची देखभाल करताना …

प्रत्येकाला आपले घर प्रिय असते. विशेषत: स्वत:च्या मेहनतीवर घेतलेले घर असेल तर त्या घराचे मूल्य अधिकच वाढलेले असते. घराचे मूल्य हे आकारावरून नाही तर कुटुंबातील वातावरणावर अवलंबून असते; परंतु एखाद्या कुटुंबाचे घर जुने असेल आणि त्याच्या साफसफाईकडे फारसे लक्ष दिले जात नसेल तर त्या घराची स्थिती बिघडू शकते. आपण काही टिप्सचा वापर केल्यास जुन्या घराला नवीन लूक देऊ शकतो. तसे पाहिले तर जुन्या घराची देखभाल काळजीपूर्वक करावी लागते. जर आपल्याला घर स्वच्छतेची आवड असेल तर घरात ये-जा करणाऱ्या मंडळींना फरक जाणवेल. जुने घर अधिकाधिक नीटनेटके आणि चांगल्या स्थितीत राहावे यासाठी काही टिप्स इथे सांगता येतील.

सर्वात अगोदर घराच्या भिंतीला कोठेकोठे तडे किंवा भेगा पडल्या आहेत, ते पाहा. भिंतीचे प्लॅस्टर निघाले असेल तर वेळीच डागडूूजी करण्याचा विचार करा. कालांतराने हा खर्च वाढू शकतो. विशेषत: पावसाळ्यात भिंत गळत असेल तर आतून-बाहेरून वॉटरप्रुफचा मुलामा देण्यास विसरू नका. जेणेकरून पावसाचे पाणी भिंतीत झिरपणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घराच्या भिंतीची नियमित देखभाल ठेवा. किमान तीन ते पाच वर्षाला रंग देऊन घराच्या भिंती मजबूत ठेवा. रंग उडून गेल्याने घरात उदास वातावरण राहू शकते. त्यामुळे सणवाराच्या निमित्ताने रंगकाम करून घराला नवखेपण द्या. तसेच घराची वायरिंगची स्थिती जाणून घ्या. दहा-वीस वर्षांपूर्वीची वायरिंग असेल तर ती संपूर्णपणे बदलून टाका. जुन्या, खराब वायरमुळे शॉर्टसर्किट होण्याची भीती असते. घरातील ज्येष्ठ, मुलांना त्यापासून धोका राहतो. त्यामुळे वेळीच वायरिंग बदला. आधुनिक शैलीतील मेन स्विच, रेग्युलर स्विचचा वापर करून घरात नावीन्य आणा.

कधी कधी वायर तुटून ती घराच्या भिंतीलगत लोंबळकत राहते. अशावेळी विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच वायरिंगच्या स्थितीबाबत आढावा घेऊन नव्याने वायरिंग करा. लहान मुलांचा हात पोचणार नाही, अशा रचनेनुसार वायरिंग करावी.

घरातील पंखे, कुलर, एसीपासून सर्व इलेक्ट्रॉेनिक उपकरणांची नियमित देखभाल करा.

घराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनची स्थिती जाणून घ्या. पाईपला लिकेज असेल तर दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो. पाईपलाईन वेळच्या वेळी बदल्यास दूषित पाणी येणार नाही.

घर खुपच जूने असेल तर छताची स्थिती जाणून घ्या. गच्चीवर वॉटरप्रुफचा वापर करून छत गळणार नाही, याची खबरदारी घ्या. जर पाणी झिरपत राहिले तर गच्ची खराब होते आणि घराचे आयुष्य देखील कमी हाते.

फर्निचर, लाकडी साहित्याची देखील वेळोवेळी तपासणी करावी. लाकडाला वाळवी लागणार नाही यासाठी ट्रिटमेंट करावी. झुरळ, किडे, पाली घरात राहणार नाही यासाठी वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करावे.

घराबाहेरच्या भिंतीला भेगा दिसत असतील तर घर चांगले दिसणार नाही. त्यामुळे भेगा बूजवा आणि चांगला रंग देऊन घराला आकर्षक लूक द्या. प्रत्येकवेळी वेगवेगळा रंग दिल्यास ये-जा करणाऱ्या मंडळींना नवखेपणा अनुभवास येतो. वॉटरप्रुफिंगचा वापर करून भिंती मजबूत करा.

घराच्या अंगणातील फरशा, टाईल्स निघाल्या असतील तर त्या नव्याने बसवा. घराजवळ मोठे झाड असल्यास ते काढून टाका आणि घराच्या भिंतीला अपायकारक ठरणार नाही, अशा रोपांची लागवड करा. बागबगिच्याची नियमितपणे देखभाल करा. अनावश्यनक तृण, गवत काढून टाका, जेणेकरून घराचा परिसर स्वच्छ आणि उठावदार दिसेल. घराच्या परिसरात डास, मच्छर येणार नाहीत, यासाठी खिडकीला जाळ्या बसवून घ्या. जुन्या जाळ्या बदलून नव्या लावल्यास खिडकीच्या सौंदर्यात भर पडू शकते. गरज भासल्यास इंटरेरियर डिझायनरची मदत घ्या. तो आपल्या जुन्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करू शकतो.

– अवंती कारखानीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)