भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा
नगर – जुन्या वादातून चौघांच्या टोळक्याने युवकावर तलवारीने हल्ला करून मारहाण केली. यात सदर युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अविनाश कैलास गायकवाड, अक्षय कल्याण जानराव, अक्षय भिंगारदिवे, रुपेश भिंगारदिवे (सर्व रा. दरेवाडी, ता. नगर) यांचा समावेश आहे.
कैलास किसन बडेकर (वय 28, रा. दरेवाडी, बडेकरवस्ती, नगर) हे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मागील भांडणातून चार जणांच्या टोळक्याने कैलास बडेकर यांच्या हातावर तलवारीने वार केला व इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी कैलास बाडेकर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.