पिंपरी – चिंचवड एमआयडीसीतील मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीने महापालिकेच्या स्ट्रॉमवॉटर ड्रेनेजमध्ये लाल रंगाचे फ्रुट ऍड्युजचे ऑईल सोडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कंपनीने सोडलेल्या ऑईलची पाहणी करून तत्काळ पंचनामा करीत कंपनी सील केली आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनास नोटीस बजावून खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चिंचवडच्या ऐश्वर्यम सोसायटी लगतच्या नाल्यातून दोन दिवस लाल रंगाचे ऑईल मिश्रित पाणी वाहू लागले होते. त्या पाण्याचा गोड वासही येवू लागला होता. याबाबत नागरिकांनी महापालिका पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.16 जुलैला सदरील नाल्याची पाहणी करत त्या कंपनीचा शोध सुरू केला. तब्बल दोन तास शोध मोहीम राबविल्यानंतर मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीचा सुगावा लागला.
चिंचवड एमआयडीसीतील अडवाणी कंपनीशेजारील गट नं. 64 मधील मे. सुपर इंडस्ट्रीज कंपनीने महापालिकेच्या स्ट्रॉमवॉटर ड्रेनेज लाईनमध्ये लाल रंगाचे फ्रुट ऍड्युजचे ऑईल सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी केली असता अंदाजे 10 हजार लिटर लाल रंगाचे ऑईल स्ट्रॉमवॉटर ड्रेनेजमध्ये सोडल्याचे आढळून आले. त्यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामा करुन कंपनी सील करत नोटीस बजावली असून आठ दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
तसेच नाल्यामधून वाहणाऱ्या ऑईलयुक्त पाण्यास आकुर्डी स्टेशन नाल्यावर बांध टाकून प्रतिबंध करण्यात आले. तसेच नदी पात्रात पाणी जावू नये, याविषयी खबरदारी घेण्यात आली. कंपनीने असमाधानकारक खुलासा केल्यास एमपीसीबीकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.