नवी दिल्ली – भारताने रशियाकडून अलिकडेच स्वस्त दराने तेल मिळवले आहे. यापुढच्या काळात आणखी स्वस्त दराने रशियाचे तेल मिळवले जाणार आहे. युक्रेनविरोधात रशियाने युद्ध सुरू केल्यापासून रशियाच्या ज्या विरोधी देशांनी रशियाकडून तेल घेणे टाळले आहे. ते तेल आंतरराष्ट्रीय पातळीवरील छोट्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इंडियन ऑईलसारख्या सरकारी तेल कंपन्या अशा छोट्या आणि कमी नाव असलेल्या व्यापाऱ्यांकडून तेल खरेदी करण्यास अनुकूल आहे. अशा छोट्या व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करणे थेट रशियाबरोबरच्या व्यवहारापेक्षा अधिक सोपे असल्याचे भारतीय तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. रोनसेफ्ट पीजेएससी सारख्या कंपन्यांबरोबरच्या व्यवहारामध्ये प्रशासकीय अडचणी तुलनेने कमी येत असल्याने या व्यवहारांना भारतीय कंपन्यांचे प्राधान्यच आहे.
वेलब्रेड आणि मॉन्टपोर्ड सारख्या कंपन्या भारतीय तेल कंपन्यांबरोबर व्यवहार करत आहेत. कोल एनर्जी आणि एव्हरेस्ट एनर्जी या भारतीय कंपन्या या व्यवहाराला पसंती देत आहेत. व्हायटोल ग्रुपसारख्या कंपन्यांनी तेलविक्रीतून माघार घेतल्यामुळे निर्माण झालेली पोकळी या छोट्या कंपन्या भरून काढत आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या छोट्या कंपन्यांची कार्यालये स्वित्झर्लंड, दुबई आणि सिंगापूरमध्ये आहेत.